जांभारी येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन
रत्नागिरी:- तिर्थक्षेत्र गणपतीपुळे, जेएसडब्ल्यू प्रकल्प आणि पुढील वर्षी मालगुंड येथे होणारे कोकणातील पहिले प्राणी संग्रहालय जवळ असल्यामुळे या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येतील. येथे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. तसेच पर्यटकांना महिला बचत गटांची उत्पादने खरेदी करता यावीत यासाठी वाटद येथे महिला बचत गटांसाठी विक्री केंद्र उभारण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक महिलांना रोजगार निर्माण होईल. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात तरुणांबरोबर महिलांनी ही पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
जांभारी येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. दिवसभरात वाटद – मिरवणे, सैतवडे सत्कोंडी येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. संबंधित गावातील नळ पाणी योजना,वाड्या वस्त्यांवरील रस्ते,प्राथमिक आरोग्य सुविधा आदी विकास कामांसाठी निधी देण्यात आला यामध्ये प्रामुख्याने वाटद- मिरवणेसाठी 8 कोटी, सैतवडे साठी 2 कोटी तसेच सत्कोंडीसाठीही निधी दिल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले, महिलांनी देखील स्वतःच्या उद्योगापुरते मर्यादित न राहता आपल्या उद्योगातून इतरांना रोजगार कसा देता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जांभारी गावाच्या विविध विकास कामांसाठी 2 कोटी 97 लाख एवढा निधी देण्यात आला आहे.आवश्यकता भासल्यास आणखी निधी देण्यात येईल.