जिल्ह्याच्या शहरी भागातील 97 शाळा अद्यापही बंदच

रत्नागिरी:- कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात कमी होऊ लागला असून ग्रामीण भागातील शंभर टक्के शाळा सुरु झाल्या आहेत; मात्र अजुनही कोरोनाची भिती शहरी भागातील शाळांमध्ये आहे. प्राथमिकच्या ९ आणि माध्यमिकच्या ८८ अशा मिळून ९७ शाळा अजुनही बंद आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यानंतर शासनाने ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीतील विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष अध्यापन सुरु करण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक शाळांमधील शैक्षणिक कामकाज वेगाने सुरु झाले आहे. गेले अनेक दिवस ऑनलाईन शिक्षणात नेटवर्कची अडचण येत असल्याने ग्रामीण भागात विद्यार्थ्यार्ची गैरसोय होत होती. प्रत्यक्ष शिकवणीमुळे गेल्या दिड वर्षातील शिक्षणांचा गोंधळ कमी होेणार आहे. जिल्ह्यातील ५ ते ८ वीच्या १ हजार ६३४ प्राथमिक शाळा असून त्यात एकुण विद्यार्थी ३२ हजार ०३७ मुले आहेत. १ हजार ५९७ शाळा सुरु झाल्या असून त्यातील २५ हजार ६५४ विद्यार्थी शाळेत हजर झाले आहेत. मात्र शहरी भागातील ९ शाळा अजुनही सुरु झालेल्या नाहीत. माध्यमिकच्या ४२६ पैकी ४१६ शाळा सुरु झाल्या असून ८५ हजार ६७५ पैकी ६५ हजार ६८९ विद्यार्थी हजर झाले आहेत. शहरातील ८८ शाळा बंद असून २४ हजार ३६९ विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. जिल्ह्यातील १० हजार ६७२ पैकी ९ हजार ९९२ शिक्षक प्रत्यक्ष शिकवणीसाठी हजर झालेले आहेत. ६८० शिक्षक अजुनही हजर झालेले नाहीत.