तिव्र पाणी टंचाई शक्य ; राजापुरात पातळी स्थिर
रत्नागिरी:- जिल्ह्याच्या भुजल पातळीत कमालीची घट झाल्याचे जानेवारीतील अहवालातून पुढे आले आहे. उन्हाळ्याचे अजूनही तीन महिने शिल्लक असून यंदा एक महिना आधीच उष्णतेच्या लाटेला आरंभ झाला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे यंदा उन्हाळ्यात तिव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत जिल्ह्याच्या पाणी पातळीत ०.०९ मीटरनी घट झाली आहे.
भुजल विभागाकडून जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबर अशी चार वेळा पाणी पातळी तपासली जाते. त्यासाठी जिल्ह्यातील ६३ विहिरी निश्चित केलेल्या आहेत. पाणी पातळीच्या नोंदी घेतल्यानंतर मागील पाच वर्षांच्या पातळीशी तुलना सरासरी काढली जाते. त्यावरून कोणत्या तालुक्यात टंचाई तिव्रता राहील याचा अंदाज बांधला जातो. जानेवारी २०२३ मध्ये घेतलेल्या नोंदीत रत्नागिरी जिल्ह्याच्या पाणी पातळीत सरासरी ०.०९ मीटरने घट झाली आहे. फक्त राजापूर तालुक्यातील पाणी पातळी स्थिर आहे. उर्वरित आठ तालुक्यात भूजल पातळीत घट झालेली दिसते. पाऊस लांबला असला तरीही ऑक्टोबर महिन्यात तिव्रता कमी झाली. त्याबरोबरच थंडीचा कालावधीही कमी राहील्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन, पाणी वेगाने जमिनीत मुरणे यासारखे प्रकार यंदा घडले आहेत. पावसावरच पाणी साठे अवलंबून असतात. तसेच भूगर्भातील पाण्याचा उपसाही वाढला आहे. यंदा देशभरातच उष्णतेची लाटे लवकर दाखल झाली आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम मानला जातो. उन्हाचा कडाका अधिक जाणवत असून मार्चच्या सुरवातीलाच अनेकांच्या विहिरीची पाणी पातळी कमी झाली आहे. नदी किनारी परिसरातील विहिरींचे पाणी अजुनही स्थिर आहे. उन्हाळा तिव्र असल्याने टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढेल असा अंदाज आहे. आताच अनेक विहिरींची पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. दरम्यान, गतवर्षी जानेवारी महिन्यात घेतलेल्या नोंदीमध्ये खेड, गुहागर, संगमेश्वर आणि लांजा या तालुक्यातील पाणी पातळी घट होती. यंदा राजापूर वगळता सर्वच तालुक्यातील पातळी कमी झालेली आहे.









