जिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ न मिळाल्यास टाळे ठोकणार

आमदार राजन साळवींसह पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेत दिला इशारा

रत्नागिरी:- मागील अनेक वर्षापासून जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचा प्रश्न प्रलंबित आहे. गेल्या काही दिवसांपासून स्त्रीरोगतज्ज्ञच नसल्याने, प्रसुतीसाठी ग्रामीण भागातून येणार्‍या महिलांचे मोठे हाल होत आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावरुन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी संतप्त झाले असून आठ दिवसात स्त्रीरोगतज्ज्ञ जिल्हा रुग्णालयात दाखल न झाल्यास टाळे ठोकण्याचा इशारा जिल्हाधिकार्‍यांसमोर आमदार राजन साळवी यांनी दिला.

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची पदे अनेक वर्ष रिक्त आहेत. अनेक महत्वपूर्ण विभाग एका-एका डॉक्टरांवर चालवले जात आहेत. अनेक डॉक्टर रुग्णालयातील प्रशासकीय कारभाराला कंटाळून बदली करुन निघून गेले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाची परिस्थितीच व्हेंटीलेटरवर टांगल्यासारखी झाली आहे. जिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ यांना बढती मिळाल्याने त्यांची बदली पालघर येथे झाली. त्यानंतर स्त्रीरोग तज्ज्ञच रुणालयाला मिळाले नाहीत. मागील 20 ते 25 दिवस स्त्री रोगतज्ज्ञांशिवाय जिल्हा रुग्णालय असल्याने, प्रसुतीसाठी येणार्‍या राजापूर, लांजा, संगमेश्वरसह रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील महिलांना डेरवणसह कोल्हापुरात सीपीआर व रत्नागिरीतील खासगी रुग्णालयांमध्ये पाठवले जात आहेत. त्यामुळे गरीब कुटुंबांचे यात हाल होत आहेत. खासगी रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल होणार्‍या महिलांना हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राजन साळवी यांच्या कानावर पदाधिकार्‍यांनी गरीब रुग्णांच्या व्यथा घातल्याने, त्यांनी जिल्हा रुग्णालयात जावून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांची भेट घेतली. परंतु त्यांच्याकडून अपेक्षित उत्तरे न मिळाल्याने. आ. राजन साळवी हे माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, प्रमोद शेरे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांच्यासह अनेक पदाधिकार्‍यांना घेऊन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांची भेट घेतली व त्यांच्या कानावर विषय घातला. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी बोलावून डॉ. फुले यांच्याशी चर्चा केली.

गंभीर प्रकृती असणार्‍या बालकांना महिला रुग्णालयात व त्याची आई सिव्हीलमध्ये हा प्रकार आणखी किती दिवस चालणार असल्याचा प्रश्न आ. साळवी यांनी विचारला. पालकमंत्र्यांनी सूचना देऊनही त्याची अंमलबजावणी अधिकारी करीत नसतील तर सर्वसामान्यांसाठी आता रुग्णालयालाचा टाळे ठोकावे लागेल असा इशारा दिला. यावेळी जिल्हाधिकार्‍यांसमोरच स्त्री रोगतज्ज्ञांविषयी डॉ. फुले यांना विचारणा करण्यात आली. परंतु त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. रुग्णालयात अशी परिस्थिती असताना याची माहिती का दिली नाही असे जिल्हाधिकार्‍यांनी शल्यचिकित्सकांना विचारणा केली. या विषयात लक्ष घालण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. एम. देवेंदर सिंग यांनी आ. राजन साळवी व शिवसेना पदाधिकार्‍यांना दिले.

चौकट
गोरगरीब रुग्णांसाठी सिव्हीलची निर्मिती झाली आहे. मात्र डॉक्टर नसल्याने जनता मेटाकुटीला आली आहे. पालकमंत्र्यांकडे कैफियत, पण त्यांच्याकडूनही उत्तरे मिळालेली नाहीत. त्यामुळे जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. डॉक्टर आले नाहीत तर जिल्हा रुग्णालयाला टाळे ठोकणार
राजन साळवी
आमदार, लांजा राजापूर, साखरपा मतदार संघ