रत्नागिरी:- जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची कमतरता असून यातून मार्ग काढण्यासाठी काही संस्था आणि खासगी वैद्यकीय अधिकार्यांची मदत घेतली जात आहे. डेरवण वालावलकर हॉस्पीटलने मदतीचा हात दिला असून याठिकाणी पीजीचे शिक्षण घेत असलेल्या 6 तज्ज्ञ वैद्यकीय अधिकार्यांची नियुक्ती केली आहे.
दर 15 दिवसांनी या 6 डॉक्टरांची नियुक्ती केली जाईल. 15 दिवस सहा डॉक्टरांची ड्युटी संपली की त्यानंतर दुसर्या सहा डॉक्टरांची नियुक्ती असे चक्राकार पध्दतीने वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. आता यातील 6 तज्ज्ञ डॉक्टर हजर झाले असून यामुळे शासकीय रुग्णालयांना मोठी मदत होत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.
या सहा डॉक्टरांमध्ये फिजिशियन, सर्जरी, आर्थोपेडिक, रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी, भूलतज्ज्ञ या तज्ज्ञांचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयात मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. शासनाकडून भरती प्रक्रिया राबविली गेली तरी याला प्रतिसाद मिळत नाही. गेली अनेक वर्षे हा प्रश्न असून स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातूनच डेरवण वालावलकर हॉस्पीटलने मदतीचा हात दिल्याने मोठा दिलासा प्रशासनाला लाभला आहे.
याठिकाणी पीजीचे शिक्षण घेणार्या डॉक्टरांची नियुक्ती टप्याटप्याने करण्यात येत आहेत. यातील सहा डॉक्टर आता हजरदेखील झाले असून त्यांनी कामही सुरू केल्याची माहिती डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली. या सहा डॉक्टरांची चांगली मदत होत आहे. रुग्णांना ताटकळत राहावे लागत नाही. शासनाने उर्वरित रिक्त पदांची भरती करावी, अशी मागणी सध्या जोर धरत
आहे.