रत्नागिरी:- तालुक्यातील मेर्वी येथील एका ६८ वर्षीय वृद्धाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नामदेव बाबल्या गुरव असे या मृत व्यक्तीचे नाव असून, पोटविकार आणि अशक्तपणामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव गुरव यांना गेल्या चार दिवसांपासून शौचास न झाल्याने त्यांचे पोट फुगले होते, तसेच त्यांना प्रचंड अशक्तपणा जाणवत होता. ही बाब निदर्शनास येताच त्यांचे चुलत भाऊ राजेश कुमार भिकाजी गुरव यांनी त्यांना ५ जानेवारी २०२६ रोजी रात्री उशिरा रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रुग्णाची प्रकृती पाहता डॉक्टरांनी त्यांना तातडीने आय.सी.यु. विभागात हलवून औषधोपचार सुरू केले. मात्र, उपचार सुरू असतानाच ६ जानेवारी रोजी पहाटे ४.५० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेची नोंद पूर्णगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. ९ जानेवारी रोजी सायंकाळी या प्रकरणाची अधिकृत माहिती पोलीस दप्तरी दाखल करण्यात आली.









