जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सेवा रामभरोसे 

काही तज्ञ डॉक्टरांचा रामराम तर काहींना कोरोनाची लागण 

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना दुसरीकडे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा पुरती कोलमडून गेली आहे. एकीकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण होत असताना दुसरीकडे चोवीस तास काम आणि तणाव यामुळे काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयाला रामराम ठोकला आहे. तज्ञ वैद्यकीय अधिकारी रुग्णालयाला रामराम करीत असल्याने रुग्णालय प्रशासन अडचणीत आले आहे. एकहि फिजिशिअन सध्या उपलब्ध नसल्याने शहरातील खाजगी वैद्यकिय अधिकाऱ्यांवरच कोरोना रुग्णांच्या उपचाराचे भवितव्य अवलंबून आहे.  

जिल्हा रुग्णालयात ३० पैकी प्रत्यक्षात १५ वैद्यकिय अधिकारी सेवेत आहेत. त्यांच्यावरच कोरोनासह इतर आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी आहे. यातिल काही वैद्यकिय अधिकाऱ्यांवर शासकीय कामकाजाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर कोरोना लॅबसाठी नियुक्ती करण्यात आलेल्या दोन वैद्यकिय अधिकार्यांपैकी १ अधिकारी कोरोना पॉझिटीव्ह झाल्याने एका वैद्यकिय अधिकार्यावर लॅबची जबाबदारी आहे. 

लहान मुलांवर अनुभवाचा जोरावर अचूक उपचार करणारे डॉ. दिलीप मोरे हेहि कोरोना बाधित झाले आहेत. सेवा निवृत्तीनंतरहि चिमुरड्यांना रुग्णसेवा देण्याची महत्वाची कामगिरी डॉ.मोरे यांनी अनेक वर्षे बजावली. परंतु त्यांनीहि आता जिल्हा रुग्णालयाला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे.