जिल्हा रुग्णालयातील वर्ग 4 कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा पवित्रा

रुग्णालय प्रशासनासमोर नवे संकट; रिक्त पदे भरण्याची मागणी 

रत्नागिरी:- कोविड रुग्णालयातील वर्ग 4 ची पदे अपुरी आहेत. यामुळे काम करताना उपलब्ध कर्मचारी वर्गावर ताण पडत आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. अस्वच्छतेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांचा रोष कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. अतिरिक्त कर्मचारी देण्याचे आश्वासन अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे हजर कर्मचारी दडपणाखाली आहेत. यामुळे वर्ग 4 चे मनुष्यबळ तत्काळ उपलब्ध करून न दिल्यास 10 ऑगस्ट पासून आंदोलन करण्याचा इशारा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. त्यामुळे जिल्हा  रुग्णालय प्रशासनाच्या अडचणीत अधिक भर पडण्याची शक्यता आहे.

संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी प्रशासनाकडे व्यथा मांडण्यात आल्या असून अशी निवेदने देण्यात आली आहेत. मात्र ती धूळखातच पडून आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील वर्ग 4 कर्मचारी हतबल होत आहेत. कोविड रुग्णालय म्हणून सुरु झाल्यापासून सर्व रुग्णालयीन कर्मचारी रात्रंदिवस  काम करत आहेत आहेत . त्यांच्या व्यथा जाणून घ्यायला कुणालाच वेळ नाही. एक कर्मचारी चार वॉर्ड म्हणजे १००  रुग्ण सांभाळत आहे. त्यामुळे कचरा सुध्दा वॉर्डमधून काढला जात नाही. स्वच्छतेच्या नावाचा बोजवारा उडाला आहे . त्यामुळे रुग्णांच्या रोषालाही कर्मचाऱ्यांनाच सामोरे जावे लागत आहे. 

कर्मचारी  बाधित होण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहेत. आधीच तुटपूंज्या कर्मचारी वर्गाने त्रस्त झालेल्या या कर्मचाऱ्यांना आणखीनीच चेपलं जात आहे. अनेक वेळा कर्मचारी उद्या देणार ,परवा येणार अशी पोकळ आश्वासनेच देण्यात येत आहेत. आता तर कहरच झाला आहे,  की माणसं काम करायलाच कोण येतच नाहीत हे कारण सांगितले जात आहे. कित्येक कर्मचारी निवृत्त झाले काही मयत झाले. त्या जागी सुध्दा कर्मचारी वर्ग भरलेला नाही उलट आहे त्याच कर्मचाऱ्यांना राबवून काम केली जात आहेत असा आरोप संघटनेने केला आहे.

तुटपुंज्या कर्मचाऱ्यांमुळे हजर कर्मचारी दडपणाखालीच काम करत आहेत.त्यामुळे त्यांचे मानसिक खच्चीकरणही होत आहे व संतुलनही बिघडत आहे. तरी त्वरीत वर्ग ४ कर्मचारी वर्ग रिक्त पदे भरण्यात यावीत. जर या निवेदनाचा त्वरीत विचार झाला नाही. तर 10 ऑगस्ट रोजी सर्व वर्ग ४ कर्मचारी आंदोलनाचा पवित्रा घेतील व या सर्वांची जबाबदारी प्रशासनावर राहिल असा इशारा संघटनेच्या वतीने  अध्यक्ष श्री. वासुदेव वाघे, सरचिटणीस श्री. विजय जाधव ,कोषाध्यक्ष श्री.चंद्रशेखर सागवेकर , उपाध्यक्ष श्री. दिनकर कांबळे यांनी दिला आहे.