जिल्हा रुग्णालयातील अनागोंदीवर मनसेचा इशारा

तातडीने सुधारणा न झाल्यास जनआंदोलन

रत्नागिरी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्णालयातील अनागोंदी कारभाराबाबत आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मनसे तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची भेट घेऊन रुग्णालयातील विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले तसेच तातडीने सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली.

मनसेच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात हृदय रोग, कॅन्सर, मेंदूविकार यांसारख्या गंभीर आजारांवरील अत्याधुनिक उपचार सुविधा व औषधोपचारांचा अभाव असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच अशा आजारांच्या निदानासाठी तज्ञ डॉक्टरांची मोठी कमतरता असून तत्काळ भरती करण्याची मागणी करण्यात आली.

रुग्णालयात आपत्कालीन परिस्थितीत उपलब्ध असलेल्या सेवांची माहिती मिळावी यासाठी कोणतीही प्रभावी यंत्रणा नसल्याची तक्रार करत जनसंपर्क अधिकारी नियुक्त करून स्वतंत्र जनसंपर्क कक्ष सुरू करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय रुग्णांसोबत राहणाऱ्या नातेवाईकांची होणारी गैरसोय थांबवण्यासाठी उपाययोजना कराव्यात तसेच रुग्णालयाची स्वतःची अँब्युलन्स सेवा नाममात्र दरात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले की, जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णांना अपुऱ्या सुविधा, डॉक्टरांची अनुपस्थिती, अत्याधुनिक शस्त्रक्रिया करण्यास असमर्थता, तसेच गंभीर रुग्णांना खासगी रुग्णालयांकडे वळवण्याचे प्रकार सुरू आहेत. विशेषतः बालरुग्ण विभागात रात्रीच्या वेळी सेवांचा अभाव असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या.

संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या रुग्णालयाची स्थिती सुधारून ते अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज करणे अत्यावश्यक असल्याचे मनसेने स्पष्ट केले. गरीब व सर्वसामान्य रुग्णांसाठी हे रुग्णालय आधारस्थान असताना सध्याची दुरवस्था चिंताजनक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

दरम्यान, या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले. मात्र, तातडीने सुधारणा न झाल्यास मनसेच्या वतीने जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

यावेळी मनसे तालुका अध्यक्ष रुपेश जाधव, तालुका उपाध्यक्ष राजू पाचकुडे, ॲड. माधवी पालकर, सचिव  रोहन शेलार, सर्वेश जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.