रत्नागिरी:- येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीतील रक्ताची गरज वाढली आहे. या रक्तपेढीसाठी दरवर्षी ५ हजार रक्ताच्या पिशव्यांचे संकलन करावे लागत होते; मात्र आता केवळ मोफत पुरवठा करण्यासाठी वर्षाला पाच हजार रक्ताच्या बॅगा लागतात. यंदा वर्षभरात १४० ते १५० शिबिरांचे आयोजन करून सात हजार रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. त्यात रक्तदात्यांचा सहभागही महत्त्वाचा आहे.
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीवर जिल्ह्यातील रुग्ण अवलंबून असतात. आता शासनाने सर्वच घटकांसाठी उपचार मोफत केल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयासह अन्य सरकारी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. विविध आजारांबरोबरच अपघातग्रस्त, प्रसूती आदी राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत उपक्रमांसाठी डायलिसिस विविध शस्त्रक्रिया आदींसाठी रक्तपेढीला रक्तपुरवठा करावा लागतो. पूर्वी या रक्तपेढीची वार्षिक पाच हजार रक्तबॅगांची मागणी होती; मात्र आता ही मागणी वाढली असून, मोफत पुरवठाच आता जवळपास पाच हजार करावा लागत आहे. त्यामुळे आता या रक्तपेढीला रक्ताची गरज वाढली आहे. सध्या रक्ताची मागणी वाढल्याने या रक्तपेढीवर ताण येत आहे; मात्र रक्तदाते, विविध सामाजिक संस्था, राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे रक्तपुरवठा अखंडित ठेवण्यास मदत होत आहे. १८ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तीचे वजन ५० किलोपेक्षा अधिक असल्यास आणि हिमोग्लोबिन १२.५ पेक्षा अधिक असल्यास त्या व्यक्तीला रक्तदान करता येते.









