रत्नागिरी:- मुंबईतील महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन यांचा २०२२ चा “कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला मिळाला आहे. राज्य सहकारी बँक्स असोसिएशन ही संस्था गेली ८४ वर्षे सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य शिखर संस्था म्हणून कार्यरत आहे. या संस्थेमार्फत सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सहकारी बँका, सहकारी बँकांतील कर्मचारी, सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार दिले जातात.
मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात कै. वैकुंठभाई मेहता पुरस्कार वितरण झाले. हा पुरस्कार बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, बँकेचे कार्यकारी संचालक अजय चव्हाण, सरव्यवस्थापक डॉ. सुधिर गिम्हवणेकर यांनी स्विकारला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही तळागाळातील जनतेसाठी व शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नत्तीसाठी कृतीशिल जाणीवेतून सहकार क्षेत्रात वाटचाल करित आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बँकेच्या माध्यमातून एक सहकार पर्व सुरू झाले असून, जिल्ह्यातील शहर व ग्रामीण पातळीवरील बँकेचे ग्राहक, हितचिंतक, ठेवीदार व कर्जदार यांचे आर्थिक उन्नत्तीसाठी बँक विविध योजना राबवीत आहे. जुलै २०२१ मध्ये कोकणातील महापुरामुळे नुकसान झालेल्या उद्योगांना अल्प व्याजदराने कर्ज देऊन अडचणीतील उद्योगांना उर्जितावस्था व बळ दिले. जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांना, कोवीड काळात रूग्णांना मदत देण्यासाठी शासन, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व जिल्हा रूग्णालय यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य दिले आहे. बँकेच्या ठेवींमधील वृध्दी, कर्जवसुली तसेच नफ्यामध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे. यासाठी बँकेचे सभासद, संचालक, कर्मचाऱ्यांसह सर्वांनी बँकेचे अध्यक्ष कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बँकेला महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण व सहकारनिष्ठ असे दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांना “बेस्ट चेअरमन पुरस्कार” दोन वेळा प्राप्त झाला आहे. त्यापैकी इंटेलिक्चुअल पिपल्स फाऊंडेशन, दिल्ली यांचेकडून २०२२ चा “बेस्ट चेअरमन परफॉर्मन्स” पुरस्कार नवी दिल्ली येथे ३१ जुलै २०२३ रोजी प्रदान करण्यात आला आहे. बँकेला आतापर्यंत एकूण १७ पुरस्कार प्राप्त झाले असून त्यात कै. वैकुंठभाई मेहता पुरस्काराची बर पडली आहे.
ठेवी २ हजार ४१० कोटीवर
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे ३१ मार्च २०२३ अखेर ठेवी २ हजार ४१० कोटी, कर्जे १ हजार ६६२ कोटी, बँकेचा एकूण व्यवसाय ४ हजार ०७२ कोटी इतका आहे. बँकेचा ढोबळ एनपीए २.१० टक्के असून बँकेला सलग १२ वर्षे ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला आहे. तसेच सलग ११ वर्षे नक्त एनपीए चे प्रमाण शुन्य टक्के आहे.









