जिल्हा बँकेचे 21 पैकी 6 संचालक बिनविरोध; 25 ऑक्टोबरला छाननी प्रक्रिया

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अध्यक्ष डॉ.तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष श्री.बाबाजी जाधव यांच्यासह सहा संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. 21 पैकी सहकार पॅनेलचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. शुक्रवारी अखेरच्या दिवशी 17 उमेदवारांनी 20 अर्ज दाखल केले आहेत. एकूण 56 उमेदवारांनी 80 अर्ज दाखल केले आहेत. सर्व अर्जांची छाननी दि.25 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता सहकारच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सुरू होणार आहे.

चिपळूण तालुका मतदारसंघातून डॉ.तानाजीराव चोरगे, खेड तालुका मतदारसंघातून बाबाजी जाधव, दापोली तालुका मतदारसंघातून सुधीर कालेकर, संगमेश्‍वर तालुका मतदारसंघातून राजेंद्र सुर्वे, जिल्हास्तरीय  मागासवर्गीय मतदारसंघातून जयवंत जालगावकर, गृहनिर्माण मतदारसंघातून ॲड.दीपक पटवर्धन हे बिनविरोध निवडून आले आहेत.  यांच्या विरोधात अन्य उमेदवारांनी अर्ज दाखल न केल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी दुपारी 2 वाजता संपली आहे. प्राप्त अर्जांची छाननी दि.25 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजल्यापासून सहकारच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सुरू होणार आहे. छाननीनंतर आणखी काही उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शुक्रवारी रत्नागिरी तालुका मतदारसंघातून गजानन कमलाकर पाटील, प्रल्हाद महादेव शेट्ये, सचिन रघुनाथ गिजबिले यांनी प्रत्येकी एक, लांजा तालुका मतदारसंघातून विद्यमान संचालक आदेश दत्तात्रय आंबोळकर यांनी दोन, भाजपा तालुकाध्यक्ष महेश रवींद्र उर्फ मुन्ना खामकर यांनी एक अर्ज दाखल केला आहे.

मंडणगड तालुका मतदारसंघातून रघुनाथ पांडुरंग पोटसुरे, खेड तालुका मतदारसंघातून उपाध्यक्ष बाबाजी गोपाळराव जाधव यांनी प्रत्येकी एक, महिला राखीव मतदारसंघातून सहकार पॅनेलच्या सौ.दिशा दशरथ दाभोळकर यांनी दोन, जिल्हास्तरीय कृषी पणन मतदारसंघातून आमदार शेखर निकम यांनी दोन, औद्योगिक वाहतूक मतदारसंघातून इब्राहीम अहमद दलवाई, हरेश्‍वर हरिश्‍चंद्र कालेकर यांनी प्रत्येकी एक, मजूर मतदारसंघातून राजेंद्र मधुसूदन घाग यांनी दोन, कुक्कुटपालन मतदारसंघातून संचालक अमजद बोरकर, विवेक शिवाजीराव सावंत यांनी प्रत्येकी एक, अनुसुचित जाती मतदारसंघातून संचालक जयवंत जालगावकर यांनी एक, नागरी सहकारी पतसंस्था मतदारसंघातून भाजपाचे नित्यानंद भार्गव दळवी, राजापूर तालुका मतदारसंघातून रविकांत रमेश रूमडे यांनी प्रत्येकी एक अर्ज सादर केला आहे.