जिल्हा पोलिस दलातील 212 पोलीस अंमलदारांना पदोन्नती 

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील 212 पोलीस अंमलदारांना पदोन्नती सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या विशेष अनुज्ञा याचिकेच्या अधीन राहुन  देण्यात आली. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी 1 जुलै रोजी काढले. यामध्ये ३१ पोलीस हवालदार यांना सहा. पोलीस उपनिरीक्षक या पदावर, ७२ पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार या पदावर आणि १०९ पोलीस शिपाई यांना पोलीस नाईक या पदावर पदोन्नती देण्यात आली.

पदोन्नती देण्यात आलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक डॉ. गर्ग यांनी सन्मानित केले. पदोन्नत झालेल्या ७० पोलीस अंमलदारांना पोलीस अधिक्षक डॉ. मोहीत कुमार गर्ग, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती जयश्री देसाई आणि पोलीस उप अधिक्षक एस. एल. पाटील, पोलीस उप अधिक्षक  यांच्या हस्ते व अन्य पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या वरिष्ठ पदाचे स्टार व फित लावण्यात आली. त्या प्रमाणे जिल्ह्यातील अन्य पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या व पदोन्नती झालेल्या पोलीस अंमलदारांना उपविभागीय स्तरावर पदोन्नतीबाबत अभिनंदन करण्यात आले. 

सदर पदोन्नती देण्याचे आदेश निर्गमित करण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीत पोलीस उपअधिक्षक (मुख्यालय) एस. एल. पाटील, प्रमुख लिपीक मनोज सावंत, निलेश नाईक, राकेश सावंत, विक्रांत घाग, पोलीस हवालदार दिपक गोठणकर, पो.ना. रोहित जाधव आणि पो.शि. गणेश मांगले यांनी विशेष सहभाग घेतला.