जिल्हा परिषद विरुद्ध पंचायत समिती वाद वाढण्याची चिन्हे 

‘सरस’ कोण ठरणार; सभापतींचे नाव डावलल्याने नाराजी

रत्नागिरी:- सरस दिवाळी महोत्सवाचे आम्ही यजमान होतो. जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी, पदाधिकारी याला उपस्थित होते. मात्र पंचायत समितीच्या सभापतींचे नाव निमंत्रण पत्रिकेत नाही किंवा त्यांना निमंत्रण देण्यात आले नाही. कसली विचारणा झाली नाही, हे योग्य नाही. त्यामुळे सरसमध्ये काय झाले याच्या आढाव्याची आम्हाला गरज नाही, या शब्दात सदस्य गजानन पाटील यांनी आढावा सागणाऱ्या अधिकाऱ्यांना पंचायत समितीच्या मासिक सभेत रोखल्याने सभेचे वातावरण काही काळ गंभीर झाले. मात्र गट विकास अधिकाऱ्यांनी पुढील विषय घेऊन वेळ मारून नेली. 

पंचायत समिती सभापती संजना माने यांच्या अध्यक्षतेखाली आजची मासीक सभा झाली. यावेळी उपसभापती उत्तम सावंत, गट विकास अधिकारी तुकाराम जाधव यांच्यासह सदस्य व खातेप्रमुख उपस्थित होते. 

विषयपत्रिकेवरील विषयांनुसार खातेप्रमुखांकडुन आढावा घेण्यात आले. यावेळी ग्रामीण विकास यंत्रणेचा आढावा देताना दिवाळीमध्ये झालेल्या सरस दिवाळी महोत्सवाचा आढावा खातेप्रमुख श्री. चव्हाण यांनी दिला.  तेव्हा सरस महोत्सवामध्ये हिरकणी बचत गट आणि कोकणरत्न मिरजोळे गट सर्वोत्कृष्ट ठरले. या महोत्सवामध्ये मोठी उलाढाल झाली. डिसेंबरमध्ये पुन्हा महोत्सव घेण्याचा विचार आहे,  असा आढावा दिला. एवढयात सदस्य गजानन पाटील म्हणाले, एवढा मोठा सरस दिवाळी महोत्सव झाला. रत्नागिरी तालुक्याकडे याचे यजमानपद होते.

पंचायत समिती सभापती यांचे निमंत्रण पत्रिकेवर नाव येणे आवश्यक होते. तसेच त्यांना महोत्सवासाठी निमंत्रण करायला हवे होते. मात्र साधी विचारणाही झाली नाही, हे योग्य नाही. त्यामुळे सरसचा आढावा देण्याची गरज नाही, असे स्पष्ट करीत आढावा थांबविला. भाजपच्या सदस्या सौ. चव्हाण यांनी देखील आक्षेप घेत म्हणाल्या,  सरसमध्ये साधे सभापतींचे नाव देखील घेतले नाही.
त्यानंतर शिक्षण विभागाचा आढावा घेण्यात आल्या. यामध्ये दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा पुन्हा सुरू झाल्याचे सांगितले. उद्या राष्ट्रीय संपादणुक सर्व्हेसाठी तालुक्यातील ४६ शाळाची निवड झाली आहे. यामध्ये तीसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या वर्गांचा समावेश असून यामध्ये विद्यार्थ्यांच्या मुलभुत क्षमतेची तपासणी होणार आहे. सर्व बोर्डाच्या शाळांचा यामध्ये समावेश असून वरिष्ठ पातळीवर या शाळांची निवड झाली. निवड झालेल्या सर्व शाळा खासगी असल्याचा आक्षेप सदस्या सौ. चव्हाण यांनी घेत जिल्हा परिषदेचा शाळांचा विचार व्हायला हवा, होता, असे मत त्यांनी मांडले. जलजिवन मिशन योजनेतून तालुक्यात १ कोटी ९७ लाखाची ८ कामे घेण्यात आली आहेत.  त्यापैकी ३ कामांना प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. यामध्ये पावस, पिरंदवणे, पानवल गावांचा समावेश आहे.