जिल्हा परिषद महिला, बालविकास कर्मचारी तीन महिने वेतनाच्या प्रतिक्षेत

रत्नागिरी:- संपूर्ण देश ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करीत असताना रत्नागिरी जिल्हा परिषदेतील महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील कर्मचारी मात्र मागील तीन महिने वेतन नसल्याने आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत.

शासकीय निमशासकीय कर्मचार्‍यांना उत्पन्नाचा इतर स्त्रोत नसल्याने प्रत्येक महिन्यात मिळणार्‍या वेतनावर आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवावा लागतो. मागील तीन महिन्यांपासून वेतन थकल्याने घरखर्च चालविणे अशक्य झाले असून भाड्याच्या घरात राहणार्‍या कर्मचार्‍यांना घरमालकाचा तगादा सहन करावा लागत आहे. तसेच गृहकर्ज, एल आय सी चे थकीत हप्ते आणि आर्थिक अडचणीमुळे दैनंदिन गरजांची पूर्तता करणे कठीण होत असल्याने याचा परिणाम कर्मचार्‍यांच्या मन: स्वास्थ्यावर होत आहे. मागील तीन महिन्यांचे वेतन थकल्याने व उदरनिर्वाहाचाच प्रश्न निर्माण झाल्याने भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीस सन्माननीय जीवन जगण्याच्या दिलेल्या हक्कासच बाधा निर्माण होत असून आझादी का अमृत महोत्सव साजरा करीत असताना जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या प्रलंबित वेतनाबाबत शासकीय व प्रशासकीय पातळीवर उदासीनता दिसून येत असल्याची खंत कर्मचार्‍यांमधून व्यक्त होत आहे. महिला व बालविकासच्या कर्मचार्‍यांच्या वेतनाचा प्रश्‍न वारंवार प्रलंबित राहत असल्याने नाराजीचे सूर उमटत आहेत.