रत्नागिरी:-जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्यांचा कार्यकाळ 20 मार्चला पूर्ण झाल्यानंतर कारभार प्रशासकाच्या हाती सोपवण्यात आला आहे. त्यामुळे पदाधिकार्यांचे स्वियसहाय्यक (पीए) आपापल्या मुळ जागेवर परतले आहेत. पदाधिकारी उतरल्यानंतर दोनच दिवसात सामान्य प्रशासनकडून ही कार्यवाही करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह चार सभापतींना कामकाज सांभाळण्यासाठी स्वियसहाय्यक दिले जातात. नियमित कर्मचार्यांमधूनच त्यांची नियुक्ती केली जाते. अध्यक्षांकडे तीन, उपाध्यक्षांकडे दोन तर विषय समिती सभापतींकडे प्रत्येकी एक स्वियसहाय्यक कार्यरत होते. सत्ताधार्यांशी जुळवून घेणार्यांना आणि कार्यकर्त्यांना सांभाळून घेतील अशाच कर्मचार्यांची या ठिकाणी वर्णी लागते. यातील सर्वजण लिपिक पदावरील व्यक्तींची निवड करण्यात येते. या निवडींमुळे नियमित कामकाजावरही परिणाम होतो. सध्या जिल्हापरिषदेतील अनेक पदे रिक्त आहेत. या परिस्थितीत पदाधिकार्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर स्वियसहाय्यकांना सामान्य प्रशासनकडून तत्काळ पत्र देऊन मुळ जागेवर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधितांनीही तत्काळ याची कार्यवाही करत आपल्या टेबलच पदभार स्विकारले आहेत.