जिल्हा परिषद, पंचायत समिती उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज अंतिम दिवस

चौथ्या दिवशी अर्जांचा पाऊस; चिपळूण, खेड आणि दापोलीत चुरस वाढली

रत्नागिरी:- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेने आता वेग घेतला आहे. मंगळवार, २० जानेवारी रोजी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी ७१ तर पंचायत समितीसाठी १२४ उमेदवारांनी आपले नशीब अजमावण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत.

अर्ज भरण्याच्या पहिल्या दोन दिवस अत्यंत संथ गतीने सुरू असलेली ही प्रक्रिया सोमवारी काही प्रमाणात वाढली आणि मंगळवारी २० जानेवारीला या प्रक्रियेने उच्चांक गाठला. २० जानेवारी रोजी केवळ एका दिवसात जिल्हा परिषदेसाठी ६० तर पंचायत समितीसाठी १०८ नवीन अर्ज प्राप्त झाले आहेत. चिपळूण येथे सर्वाधिक चुरस पाहायला मिळत आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी १७ तर पंचायत समितीसाठी २६ अर्ज दाखल झाले आहेत. खेड तालुक्यातून पंचायत समितीसाठी सर्वाधिक ४० अर्ज दाखल झाले आहेत, तर जिल्हा परिषदेसाठी १६ अर्ज आले आहेत. दापोलीतही उमेदवारांचा उत्साह मोठा असून येथे एकूण २५ अर्ज (११ जि.प. + १४ पं.स.) प्राप्त झाले आहेत. गुहागरमध्ये २८ तर रत्नागिरी तालुक्यात १९ एकूण अर्ज दाखल झाले आहेत. लांजा तालुक्यात अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही, तर राजापूरमध्ये केवळ ३ अर्ज आले आहेत.

अंतिम टप्प्यात गर्दी वाढण्याची शक्यता
अर्ज भरण्याची मुदत २१ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत असल्याने, शेवटच्या दिवशी उर्वरित उमेदवारांची आणि विशेषतः लांजा-राजापूर सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक राजकीय पक्षांनी आपले ‘ए’ आणि ‘बी’ फॉर्म शेवटच्या क्षणी देण्याचे धोरण ठेवल्यामुळे ही गर्दी वाढत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.