जिल्हा परिषद गावागावात राबवणार प्लास्टिक मुक्त मोहीम

रत्नागिरीः– प्लास्टीक मुक्त मोहीम गावागावात राबविण्यासाठी जिल्हा परिषद सज्ज झाली असून प्रायोगिक तत्त्वावर याची गावात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

  शुक्रवारी (ता. 8) जिल्हापरिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी घेतलेल्या बैठकीला अमरहिंद सिंज कंपनीचे हेमचंद्र हळदणकर, प्रकल्प संचालक श्रीमती एन. बी. घाणेकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रोहीत देसाई, सह्याद्री निसर्गचे भाऊ काटदरे, सोशल लॅब एनवार्मेंटल संघटनेचे कुणाल ठक्कर, एमआयडीसीचे विभागिय अधिकारी आणि प्लास्टीक विकत घेणार्‍या पाच कंपनींचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्लास्टीक वेस्ट मॅनेजमेंटची अंमलबजावणी पंधरा दिवसात होणार असून लवकरच जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्याबरोबर बैठकीत घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक गाव प्लास्टीक मुक्त करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येत असून प्लास्टीवर प्रक्रिया करणार्‍या कंपन्यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. गावातील प्लास्टीक गोळा करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठीत नागरिक, स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येईल. ते प्लास्टीक खडपोलीतील अमरहिंद सिंज कंपनीने विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करण्याची तयारी दर्शवली आहे. कचरा गोळा करणे, वर्गीकरण करणे, प्लास्टीक जाळण्यापासून रोखणे याची जनजागृती व प्रशिक्षण जिल्हापरिषदेसह स्वयंसेवी संस्था करणार आहे. प्लास्टीक गोळा करुन कंपनीला विकत देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे असेल. यासाठी येणार्‍या खर्चाचेही अंदाजपत्रक बनवण्यात येणार आहे. प्लास्टीक मुक्त मॉडेल गाव संकल्पना यशस्वी करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर  गावे निवडण्यात येणार आहेत. भविष्यात संपूर्ण जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक निधीची तरतूदही केली जाणार आहे. प्लास्टीक गोळा करुन त्यावर प्रक्रिया करण्यासाठी चांगले काम करणार्‍या ग्रामपंचायतीला पुरस्कार देऊन सन्मानित करण्याबाबतही चर्चा झाली आहे. त्याचे मुल्यमापन ग्रामपंचायत व स्वच्छता विभागाकडून केले जाणार आहे.