जिल्हा परिषद आरोग्य विभाग राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

रत्नागिरी:- राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्यावतीने केलेल्या मुल्यमापनात रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य विभाग राज्यात दुसरा ठरला आहे.

राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यावतीने दर महिन्याला शासकीय आरोग्य संस्थांचे आरोग्य विभागाच्या सेवांच्या इंडिकेटरनिहाय मुल्यमापन करण्यात येते. यात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि महापालिका आरोग्य विभाग यांची कामगिरी तपासून त्यांचे राज्य पातळीवर स्थान निश्चित करण्यात येते. यात संबंधित शासकीय आरोग्य संस्थेने माता बाल आरोग्य, कुटूंब कल्याण कार्यक्रम, एकात्मिक सर्वेक्षण कार्यक्रम, असंसर्ग जन्य आजार सर्वेक्षण, नियमित लसीकरण, किटकजन्य रोग्य नियंत्रण कार्यक्रम, आयुष्यमान भारत योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील विविध कार्यक्रम, जिल्हा क्षय रोग आणि कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम यात महिनाभरात केलेल्या कामगिरीचे मुल्यमापन करून त्यानुसार राज्य पातळीवर पहिल्या तीन जिल्ह्यांना क्रमवारी देण्यात येते. त्यानुसार गोंदिया जिल्ह्याचा प्रथम तर रत्नागिरी जिल्ह्याचा द्वितीय क्रमांक आला आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेतर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांचा ग्रामीण भागातील यंत्रणेवर लक्ष असते.

राज्य पातळीवर आरोग्य विभागाकडून केलेल्या मुल्यमापनात रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने चांगली कामगिरी केली आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभाग मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी चांगली कामगिरी करण्याचे नियोजन केले आहे. यापूर्वीही आरोग्य विभाग दक्ष राहून ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरवल्या आहेत.

  • डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. रत्नागिरी