रत्नागिरी:- जिल्हा परिषद आरोग्य विभागातील दोन लेखाशिर्षातील शंभरहून अधिक कर्मचार्यांना उसनवारीतूनच यंदा गणेशोत्सव साजरा करावा लागत आहे. वेतनाचे अनुदान मंगळवारी (ता. ३०) आरोग्य विभागाकडे प्राप्त झाले असून पुढील कार्यवाहीसाठी किमान एक- दोन् दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतरच पगार बँक खात्यात जमा होणार आहे.
कोकणातील गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहात घरोघरी साजरा केला जातो. सामान्य व्यक्तीपासून ते अगदी श्रीमंतांपर्यंत सर्वांचीच अपार श्रध्दा यामागे आहे. शासकीय कर्मचार्यांनाही गणेशोत्सवापुर्वी पगार जमा होईल याची काळजी घेतली जाते; परंतु यंदा आरोग्य विभागातील दोन लेखाशिर्षातील समाविष्ट कर्मचार्यांचे वेतनाचे अनुदानच आलेले नव्हते. यामध्ये शंभरहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. गणशोत्सव जवळ आला तरीही पगार झालेला नसल्याने सर्वच गोष्टी रखडल्या होत्या. उत्सवाची तयारीही अनेकांनी उसनवारीतूनच करण्यास सुरवात केली. विजबिल, पाणी पट्टी, घरपट्टीयासह विविध खर्चांचे गणितही पगाराच्या तारखेवर अवलंबून असते. काहींचे बँकेचे व विमा हप्तेही यामधून कापून जात असतात. पगार रखडला की या सर्वच गोष्टीचे वेळापत्रकच बिघडते. तीच परिस्थिती आरोग्य विभागातील दोन लेखाशिर्षातील कर्मचार्यांची झाली आहे. गणेशोत्सव साजरा करतानाही त्यांनी हात आखडता घेतला होता. सुदैवाने गणेश आगमनाच्या पुर्वसंध्येला अनुदान जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे जमा झाल्याचे वृत्त आले. त्या विभागातील कर्मचार्यांना थोडासा दिलासा मिळाला. मंगळवारी सायंकाळपर्यंत संबंधित कर्मचार्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता होती; मात्र तसे झाले नाही तर एक दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. ३१ ऑगस्टला गणेश आगमनाची सुट्टी असते. त्यामुळे बँकेच्या सर्वच प्रक्रिया बुधवारी होती. त्यानंतर पगार कर्मचार्यांच्या बँक खात्यात जमा होतील. त्यामुळे आरोग्य विभागातील कर्मचार्यांना थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे.









