रत्नागिरी:- जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. पुरस्कार वितरणांचा कार्यक्रम लवकरच निश्चित केला जाणार आहे. यंदा एकूण 22 प्रस्ताव दाखल झाले होते. त्यापैकी दहा जणांना हे पुरस्कार देण्यात आले, अशी माहिती अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिली.
पुरस्काराची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदूराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने, शिक्षण व अर्थ सभापती चंद्रकांत मणचेकर, जि.प. सदस्य महेश म्हाप, रचना महाडिक आदी उपस्थित होते.
शैक्षणिक क्षेत्रात उकृष्ट व उल्लेखनिय काम करणार्या शिक्षकांना दरवर्षी हा आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. यावर्षी जिल्हाभरातून 22 प्रस्ताव जि.प.कडे दाखल झाले होते. पुरस्कार समितीने त्याची तपासणी तसेच मुलाखती घेवून 10 शिक्षकांना पुरस्कार दिले आहेत. प्रत्येक तालुक्यात एक व एक विशेष पुरस्कार असे जाहीर झाले आहेत. पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे पुढीलप्रमाणे. एकनाथ चांदे (शेडवई, ता.मंडणगड), महेश कोकरे (दापोली), राजेश भागणे (कर्जी, ता.खेड), शितल राजे (गोवळकोट, ता.चिपळूण), ममता विचारे (अंजनवेल, ता.गुहागर), नथुराम पाचकले (आंबेड बुद्रूक ता.संगमेश्वर), विद्याधर कांबळे (लाजूळ ता.रत्नागिरी), नानासाहेब गोरड (देवधे, ता.लांजा), दीपक धामापूरकर (सोलगाव ता.राजापूर) तर विशेष पुरस्कार सुनिल भोसले (खानवली ता.लांजा) यांना प्राप्त झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण 5 सप्टेंबर या शिक्षकदिनी केले जाते. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वितरणाची तारीख अजून निश्चित झाली नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. खेड तालुक्यातील राजेश भागणे यांनी जिल्हा परिषद शाळांमधील मुलींचा खो-खोचा संघ तयार केला होता. जिल्हास्तरीय शालेय स्पर्धांमध्ये या संघाने अव्वल कामगिरीही केली होती. तसेच राज्यस्तरावर नेतृत्त्व करण्यासाठी तुंबाडमधील मुले-मुली घडविण्यात श्री. भागणे यांचा मोलाचा वाटा होता.