जिल्हा परिषदेतील पाच कर्मचारी कोरोना बाधित; 50 टक्के उपस्थितीचा नियम पायदळी

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेत पाच कर्मचारी कोरोना बाधित आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. मार्च एंडिंग क्लोज झालेले नसल्याने काही विभागात अजूनही पन्नास टक्केचा नियम पाळला जात नाही, तर पुढार्‍यांच्या गाडीचा आधार घेऊन काहीजण कार्यालयात ये-जा करत आहेत. त्यांच्यावर बंधन घालण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

कोरोनातील दुसर्‍या लाटेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयाने कडक निर्बंध घातले आहेत; परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा प्रकार पुढे आला आहे. मार्च एंण्डींग क्लोज झालेले नसल्याने अनेक कर्मचार्‍यांची उपस्थिती 50 टक्के पेक्षा अधिक आहे. बिले खर्ची पडलेली नसल्याने पुढार्‍यांच्या गाडीचा आधार घेऊन काहीजणं आतमध्ये प्रवेश मिळवत आहे. त्यामुळे प्रशासनाने केलेल्या निर्बंधांची कसुन अंमलबजावणीच होताना दिसत नाही. सतर्कता म्हणून जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी केली. त्यामध्ये पाच जणं बाधित आढळले. संबंधित विभाग सॅनिटाईज करण्यात आला आहे. नियमांची कसुन अंमलबजावणी करण्याची आवश्यकता भासत आहे. प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. प्रवेशद्वारावर अनेकजणं वॉचमनने दिलेल्या सुचनांचे पालन करत नाहीत. त्यासाठी प्रवेश द्वारावर लिपिक पदावरील व्यक्तीची नेमणुक करण्यात आली आहे. कर्मचार्‍यांनी कार्यालयात एक दिवसा आड उपस्थित राहावे अशा सुचना दिल्या आहेत.