रत्नागिरी:- कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षांपासून ग्रामविकास विभागातील कर्मचार्यांच्या बदल्या करता आल्या नव्हत्या. त्यामुळे या वर्षी क व ड वर्गातील कर्मचार्यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचार्यांच्या बदल्यांसाठी आवश्यक असलेली यादी तयार करण्याचे आदेश सर्व विभागांना देण्यात आले आहेत.
कोरोना महामारीमुळे 2020 मध्ये जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. मागील वर्षीही ग्रामविकास विभागाने केवळ 15 टक्के कर्मचार्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून रखडलेली बदली प्रक्रिया या वर्षी राबविण्याचे आदेश ग्रामविकास व जलसंधारण विभागाने दिले आहेत. त्यानुसार सर्व विभागांमधील कर्मचार्यांची सेवाज्येष्ठता यादी, 55 वर्षांवरील कर्मचारी, गंभीर आजार असलेले कर्मचारी आदींप्रमाणे वर्गवारी करून बदलीसाठी पात्र कर्मचार्यांची अंतिम यादी 31 मार्चपर्यंत तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सामान्य प्रशासन विभागाने याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांना तसेच गट विकास अधिकार्यांना पत्र पाठविले असून, याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षकांच्या बदल्या होणार
कोरोना महामारीमुळे शिक्षकांच्या बदल्याही थांबल्या आहेत. अनेक वर्षापासून दुर्गम भागात नोकरी करणार्या शिक्षकांना यामुळे बदली करून घेता आलेली नाही. यामुळे शिक्षकांच्याही बदल्या ऑनलाइन पद्धतीने होणार असून, त्यासाठीची सर्व माहिती संकलित करण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. तसेच आंतरजिल्हा बदल्याही कोरोनामुळे थांबल्या होत्या, त्याही या वर्षापासून मार्गी लागणार आहेत.