रत्नागिरी:-स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक मुलभूत क्षमता प्राप्त व्हावी यासाठी जिल्हापरिषदेच्या शाळांमध्ये ‘फोर्स-५१’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात संगमेश्वर तालुक्यातील देवळे बीटमधील ५८ शाळांची निवड केली आहे. ही संकल्पना उपशिक्षणाधिकारी एस.जे. मुरकूटे यांनी मांडली होती.
शालेय विद्यार्थ्यांच्या संपूर्ण विकासासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीइआरटी) तयार केलेल्या दर्जेदार अभ्यासक्रमाचे सर्वंकष तयारी होणे ही अतिशय गरजेचे असते. कारण सदर अभ्यासक्रम बनवताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवलेले असते. म्हणून या बाबीचा गांभीर्यपूर्वक विचार करून विद्यार्थ्यांचे गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण व शिक्षकांच्याही कल्पकतेला वाव या दोन गोष्टी डोळ्यापुढे ठेवून फोर्स-५१ हा उपक्रम जिल्हापरिषदेच्या तसेच खासगी व्यवस्थापन शाळांमध्येही राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा उपक्रम देवळे बीटमधील जिल्हापरिषदेच्या ४८ व खासगी १० अशा एकूण ५८ शाळांमध्ये राबवण्यात येणार आहे. एकूण १४० शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचे प्रशिक्षणही नुकतेच पार पडले आहे. उपशिक्षणाधिकारी एस.जे. मुरकूटे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमामध्ये पहिली ते सातवी सर्व विषयांच्या प्रत्येक पाठाच्या प्रत्येक घटकांवर वेगवेगळे किमान ५१ अध्ययन-अद्यापन प्रकार, पद्धती वापरून पूरक साहित्याची सॉफ्ट कॉपी तयार करून सर्वंकष असा अभ्यास घेतला जाणार आहे. आनंदी वातावरणात शालेय अभ्यासक्रमाची सर्वंकष व परिपूर्ण तयारी करून घेणे, फक्त आणि फक्त गुणवत्ता हेच धैर्य ठेवून मार्गक्रमण करणे, शिक्षकांना त्यांच्या ज्ञानाचा व कल्पकतेचा वापर करण्यास स्वतंत्र देणे, अध्यायन व अद्यापन प्रक्रिया सोपी करणे, प्रत्येक विद्यार्थ्याला खात्रीपूर्वक व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, एका मुद्यावर सर्वांचा कस लागेल एवढी तयार करणे, जागतिक स्पर्धेत टिकून राहतील असे विद्यार्थी घडवणे, विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचा पाया तयार करणे, जि.प. शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकवून ठेवणे, ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे आदी या उपक्रमाचे उद्दिष्ट आहेत.