रत्नागिरी:-जिल्हापरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भुमिपुजन 14 मार्चला होणार असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्र्यांसह पालकमंत्री आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांसह अनेक मंत्री, खासदार, आमदारांच्या उपस्थितीत भव्यदिव्य कार्यक्रम करण्याची जोरदार तयारी चालु झाली आहे, अशी माहिती अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिली.
विद्यमान पदाधिकारी, सदस्यांची मुदत संपण्यापुर्वी जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे काम चालू व्हावे यासाठी अध्यक्ष जाधव हे गेले काही दिवस प्रयत्न करत आहेत. त्यात यशही आले असून निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ठेकेदारही निश्चित झाला आहे. भुमिपूजन कार्यक्रम ठरवण्यासाठी गुरुवारी (ता. 3) विक्रांत जाधव यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी उपाध्यक्ष उदय बने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्यासह सर्व सभापती उपस्थित होते. नवीन इमारतीसाठी निधी मिळावा म्हणून आमदार भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रांत जाधव यांनी सहा महिन्यांपुर्वी पावले उचलली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी इमारतीचा प्रस्ताव मान्य करत निधीची तरतूद केली. जिल्हापरिषदेच्या इतिहासात एवढ्या मोठ्याप्रमाणात निधी मिळवून देण्यात प्रथमच विक्रांत यांना यश आले. या भुमिपूजन कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्वचजणं उपस्थित रहावे यासाठी गाठीभेटी सुरु झाल्या आहेत. या इमारतीचे काम पुण्यातील रायकॉन कन्स्ट्रक्शनला देण्यात आले आहे. निविदेची रक्कम 44 कोटी 38 लाख रुपये असून नवीन इमारत उभारणीसाठी सुमारे चार वर्षांचा कालावधी लक्षात घेऊन जादाचा निधी मंजूर करुन ठेवण्यात आला आहे.









