रत्नागिरी:- जिल्ह्यासाठी २११ कोटींचा आराखडा मंजूर झाला होता. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा निधी कमी करण्यात आला होता. मात्र, आता पूर्ण निधी जिल्ह्याला मिळाला असून त्यापैकी १७ कोटी खर्च करण्यात आले आहेत. जिल्ह्याला नव्या आर्थिक वर्षासाठी ४९८ कोटींचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी सन २०२१-२२ साठीचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला. या बैठकीची माहिती देण्यासाठी ॲड. परब यांनी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदूराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहित कुमार गर्ग, आमदार योगेश कदम, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले की, २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्ह्याला २११ कोटींचा निधी मंजूर झाला होता. मात्र, काेरोना संकटामुळे सर्वच जिल्ह्यांचा निधी कपात करून केवळ ३० टक्के निधी दिला होता. मात्र, हा निधी आता पूर्णपणे म्हणजेच २११ कोटी रूपये इतका मिळाला असून त्यापैकी १७ कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. या बैठकीत २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला. येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्य शासनाच्या बैठकीत या आराखड्याला मंजुरी घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पालकमंत्री यांच्या उपस्थितीत बुधवारी डोंगरी आदिवासी विकास, जलजीवन मिशन आदी बैठका घेण्यात झाल्या. याविषयीही माहिती यावेळी देण्यात आली. क्रीडा संकुलाच्या प्रलंबित विषयांबाबतही चर्चा करण्यात आली. या बैठकीत आमदार योगेश कदम यांनी कोयनेचे पाणी कोकणला मिळायला हवे, ही मागणी केली असून ती रास्त आहे. याबाबतचा ठराव या बैठकीत करण्यात आला. याचा अहवाल राज्यशासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे ॲड. परब यांनी सांगितले.नव्या आर्थिक वर्षात पर्यटनावर अधिक भर दिला जाणार असून स्वतंत्र निधीची तरतूद केली जाणार आहे. त्यामुळे पर्यटन स्थळांकडे जाणारे रस्ते, अंतर्गत रस्ते यांच्या दुरूस्तीबरोबरच पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध क़रून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे परब म्हणाले.