रत्नागिरी:-कोरोनामुळे दोन वर्षे जिल्हा विकास निधीला कात्री लागली होती. मात्र गेल्या आर्थिक वर्षामध्ये अखेरच्या टप्प्यात निर्बंध उठल्यामुळे २५० कोटीचा विकास आराखड्यातील निधी मिळणार याची कल्पना होती. त्यामुळे निधी नव्हता तरी विविध खात्यांचा विकास आराखडा तयार होता. पैसे आले की ते वर्ग करायचे सुयोग्य नियोजन आणि पूर्वतयारीमुळे आमदारांचा वाढीव प्रत्येकी एक कोटीसह ५ कोटीचा निधी धरून यंदा २५० कोटी निधी १०० टक्के खर्च करण्यात आला. यामध्ये गतवर्षाच्या सुमारे ५० कोटीच्या दायित्वाचा समावेश आहे.
जिल्हा प्रशासनाच्या नियोजन विभागाने यंदाच्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस चपळाई दाखवत विकासनिधी खर्च केला. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाचे निर्बंध होते. त्यामुळे ३२ टक्के निधी कोरोनासाठी राखीव ठेवण्यात आला. मात्र शासनाने आर्थिक वर्षाच्या अखेरीस सर्व निर्बंध हटविले आणि राखून ठेवलेल्या निधीसह विकास आराखड्याचा निधी त्या-त्या जिल्ह्याला वर्ग केला. जिल्ह्याच्या विकासासाठी २०२१-२२ साठी जिल्ह्याचा वार्षिक आराखडा २५० कोटींचा होता. यात गाभा क्षेत्रासाठी १५८ कोटी ३३ लाख ६४ हजार, तसेच बिगर गाभा क्षेत्रासाठी (जनसुविधा देणाऱ्या योजना) ७९ कोटी ५० लाख ३६ हजार, नाविन्यपूर्ण व डाटा एंट्रीसाठी ९ कोटींची तरतूद करण्यात आली होती. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात यापैकी ८६ टक्के निधी खर्च झाला होता. त्यामुळे उर्वरित निधी मार्चअखेरपर्यंत खर्च होणार का, असा प्रश्न होता. परंतु ३१ मार्चअखेर हा संपूर्ण निधी १०० टक्के खर्च करण्यात प्रशासनाला यश आले. गेल्या वर्षी म्हणजे २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी २११ कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर विकास आराखड्यात वाढ करून २०२१-२२ साठी तो २५० कोटी करण्यात आला. गेल्या वर्षीच्या ५० कोटीच्या दायित्वाचाही यामध्ये समावेश आहे. त्या-त्या विभागात योग्य नियोजन आणि निधीची तरतुद करून ठेवण्यात आल्याने निधी आल्या-आल्या प्रशासनाने तो तरतुदीनुसार खर्ची पाडला.
डोंगरी विकासाचे ११ कोटी खर्च
आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत २४ कोटींचा निधी मंजूर झाला होता. हा सर्व निधीही खर्च झाला आहे. डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर ११ कोटी जिल्हा प्रशासनाला मिळाले. त्यापैकी सर्व खर्च या यंत्रणांनी खर्च केले आहेत. अनुसूचित जाती उपयोजनांतर्गत मंजूर असलेला १७ कोटी ८१ लाख रुपयांचा निधीही खर्च झालेला आहे. आदिवासी उपाययोजनांसाठी मंजूर असलेला १ कोटी ८९ हजारांचा निधीही खर्च झाला आहे.
या वर्षात मिळालेला निधी पर्यटन, आरोग्य आणि नागरी सुविधा यावर अधिक खर्च झाला आहे. याव्यतिरिक्त अल्पसंख्याक विकासासाठीही १० कोटींचा निधी मिळाला होता. त्याचबरोबर मातोश्री पाणंद योजनेसाठीही मिळालेला दीड कोटीचा निधीही खर्च झाला आहे.
-डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी, रत्नागिरी