जिल्हा चौथ्याच टप्प्यात; निर्बंध कायम

जिल्हाधिकारी यांचा आदेश; डेल्टाचा नवा धोका 

रत्नागिरी:-राज्याच्या तुलनेत जिल्ह्यात सापडलेले व्हेरीअंट ऑफ कन्सर्न आणि  कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत नसल्याने रत्नागिरी जिल्हा अद्यापही चौथ्या टप्प्यातच असल्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी जारी केले आहेत. यामुळे जिल्ह्यात चौथ्या टप्प्यातील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. पुढील आठ दिवसानंतर निर्बंधाबाबत नवे आदेश येण्याची शक्यता आहे. 

जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये व्हेरीअंट ऑफ कन्सर्नचे रुग्ण आढळून आलेले असल्यामुळे कडक निर्बंध लावण्याचे निर्देश आहेत. सदर आदेशामध्ये मागील दोन आठवडयातील प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन तसेच आरटीपीसीआर चाचण्यांचा साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर विचारात घेऊन स्तर निश्चित करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोव्हिड बाधित रुग्णांचा दोन सप्ताहातील पॉझिटिव्हीटी रेट हा 10.86 टक्के असून दोन सप्ताहातील व्यापलेल्या ऑक्सिजन बेडसची टक्केवारी 40 टक्के इतकी आहे. मागील दोन सप्ताहातील बाधित होणाऱ्या रुग्णांची दैनिक संख्या विचारात घेता बाधित रुग्ण संख्या कमी होताना दिसत नाही. सदर बाबी स्तर निश्चिती करताना व महाराष्ट्र शासनाकडील आदेशातील सूचनांचा विचार करून सदयस्थितीत रत्नागिरी जिल्हा हा स्तर चारमध्ये येत असून त्यामध्ये बदल होत नाही, असे श्री. मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेलेच निर्बंध कायम राहिले आहेत.