रत्नागिरी:- जिल्ह्यात २९ मे पासून पावसाने विश्रांती घेतली आहे. अधून मधून कोसळणाऱ्या किरकोळ सरींव्यतिरिक्त पावसाने उसंत घेतल्याने शेतकऱ्यांची पेरण्यांची कामे पूर्णतः खोळंबली आहेत. पावसाने उसंत घेताच उकाड्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. रविवार, सोमवार आणि मंगळवारी देखील पावसाच्या किरकोळ सरी पडल्या. मात्र, त्यामुळे गारवा येण्याऐवजी अधिकच उकाडा वाढला. जिल्ह्याचा सध्याचा पारा ३३ अंशांवर आहे.
पावसाने मे महिन्याच्या २० तारखेपासून जिल्ह्यात काही ठिकाणी पडण्यास सुरुवात केली. २१ मेपासून पावसाची संततधार सुरू झाली. काही तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने शेतजमिनीत पाणी भरले. जिल्ह्यातील नद्या, धरणे यांची पात्रे वाढली. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ३१ मेपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले.
त्यातच केरळमध्ये मान्सून वेळेआधी दाखल झाल्याचेही हवामान खात्याने जाहीर केले. त्यामुळे ५ जूनपासून मान्सून नियमित होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. सलग पडणाऱ्या पावसाने आतापर्यंतच्या कालावधीतील मे महिन्याचा उच्चांक गाठला होता. आतापर्यंत मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात यावर्षी पडलेल्या पावसाची वेगळी नोंद झाली.
मात्र, २९ मेपासून पाऊस पूर्णपणे थांबला आहे. त्यामुळे पुन्हा कडक ऊन पडायला सुरुवात झाली असून उष्माही वाढला आहे. २६ ते २७ अंशावर पोहोचलेले कमाल तापमान आता पुन्हा ३२ ते ३३ अंशापर्यंत वाढले आहे. त्यामुळे पुन्हा उकाड्याला सुरुवात होऊ लागली आहे.
हवामान खात्याने १ आणि २ जून रोजी किरकोळ पावसाची शक्यता व्यक्त केली होती. या दोन दिवसात अगदीच किरकोळ सरी पडल्या. त्यामुळे उकाडा अधिकच वाढला आहे. सध्या ८ जूनपर्यंत जिल्ह्यात पावसाची विश्रांती राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.