जिल्हाभरात दीड दिवसांच्या चौदा हजार बाप्पांना निरोप

रत्नागिरी:- ढोल ताशांच्या गजरात गुरुवारी जिल्ह्यात जवळपास 14 हजार दीड दिवसांच्मा गणरायांचे विसर्जन करण्यात आले. बुधवारी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जिल्ह्यात 1 लाख 69 हजार 552 गणपतींची प्रतिष्ठापना करण्मात आली. काही भक्तांच्या घरी दीड दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील 13 हजार 844 घरगुती आणि सात सार्वजनिक गणेशांचे विसर्जन करण्यात आले.

गणेश विसर्जनासाठी रत्नागिरीतील मांडवी समुद्र किनारी गणेशभक्तांनी विसर्जनासाठी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी खासगी वाहनांमधून आपल्या लाडक्या गणरायाला नेत भक्तांनी विसर्जन केले. यावेळी मांडवी समुद्र किनारी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शहरानजिकच्या भाट्ये, पांढरा समुद्र आदी किनाऱ्यांवर दीड दिवसांच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. दीड दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गणेशभक्तांनी जल्लोष आणि भक्तिभावाने बाप्पाला निरोप दिला. यानंतर पाच दिवसांचे व अडीच, सात, अकरा दिवसांचे गणेशमूर्तींचे विसर्जन टप्प्याटप्प्याने पार पडणार आहे.