रत्नागिरी:- स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा- 2 अंतर्गत केंद्र व राज्य शासनातर्फे शाश्वत स्वच्छतेसाठी गावे हागणदारीमुक्त अधिक मॉडेल केली जात आहेत.
जिल्हाभरातील 1 हजार 12 गावे अधिक मॉडेल झाली आहेत. आता या गावांमध्ये दृष्यमान स्वच्छतेसाठी कुटुंब भेटी अभियान राबविण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्हयातील हागणदारीमुक्त अधिक मॉडेल झालेल्या गावांमधून 30 सप्टेंबरपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. कुटुंब भेटीकरीता जिल्हयातील सर्व ग्रामपंचायत अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची काम घेण्यात आली असून, काही गावांमध्ये ही कामे पुर्ण झाल्याने गाव मॉडेल म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
सदर कुटुंब भेटी अभियान हे ग्रामपंचायत स्तरावरील सर्व शासकीय कर्मचारी, ग्रामसेवक, अंगणवाडी, आशा वर्कर, ग्राम रोजगार सेवक, गट समन्वयक समुह समन्वयक यांच्यामार्फत राबविले जाणार असून गृहभेटी दरम्यान कुटुंबातील सदस्यांना काही प्रश्न विचारुन माहिती घेण्यात येणार असून त्याकरीता प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टीक व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन याविषयी प्रश्न विचारले जाणार आहेत. याबाबत कुटुंबाला शाश्वत स्वच्छतेविषयी जागृत करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्हयात 1012 गावे हागणदारीमुक्त अधिक मॉडेल झाले असून या गावातून कुटुंब भेटी अभियान राबविले जाणार आहे, अशी माहिती जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकीरण पुजार यांनी दिली.