रत्नागिरी:- सुमारे ४०० वर्षांहून अधिक जुना गोरखचिंचेचा महाकाय वृक्ष रत्नागिरीत आढळल्यावर जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी त्याचे महत्व ओळखुन तत्काळ त्याचे जतन आणि संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटनदृष्ट्या या हेरिटेज ट्रीचा वापर करून येथे उत्तम पर्यटनस्थळ निर्माण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
आफ्रिका खंडात, मादागास्कर, ऑस्ट्रेलिया येथे व उष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणाऱ्या या वृक्षाला आफ्रिकन बाओबाब असे म्हटले जाते. आकर्षक भलेमोठे खोड व उंच असणारा हा वृक्ष आहे. उद्यमनगर येथील महिला रुग्णालयाच्या परिसरामध्ये हा वृक्ष आढळुन आला आहे. जिल्हाधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. वृक्ष दुर्लक्षित असून त्याच्या बुंध्याभोवती कचरा साठला असून वेलींनी झाडाला गुरफटून टाकले आहे. वर्षानुवर्षे हे झाड येथे आहे. परंतु त्याचे महत्त्व कोणालाही माहित नव्हते. सुदैवाने महिला रुग्णालयाच्या बांधकामामध्ये हे झाड शाबूत राहिले आहे. उद्यमनगर येथील स्थानिकांनी याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर या झाडाचे महत्व जिल्हाधिकारी यांनी ओळखले. ते स्वतः पर्यावरणाचे जाणकार आहेत. त्यांना या झाडाबाबत माहिती असल्याने त्यांनी तत्काळ या झाडाचे जतन करण्याचा निर्णय घेतला आहे.
गोरखचिंच आकर्षक वृक्षाचे महत्त्व
आफ्रिकन बाओबाब वृक्षांची उंची ५० फुटांपर्यंत असते. हा पानगळी वृक्षामध्ये मोडतो. खोडाचा परीघ १०० फुटांपर्यंतही असतो. खोडाचा जाड पापुद्रा राखाडी रंगाचा असतो. फुले मांसल ५ पाकळ्यांची असून, लांब देठाने झाडावर लटकत राहतात. ती रात्री फुलतात. त्यांना मंद सुवास असतो. फुले गळून तेथे बाटलीच्या आकाराची फूटभर लांबीची फळे येतात. ती राखाडी रंगाच्या व कठीण कवचाच्या दुधी भोपळ्यांसारखी दिसतात. खोडामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठते, त्यामुळे पाणी कमी असलेल्या प्रदेशातसुद्धा हे वृक्ष तग धरतात. त्यांचे आयुष्य १००० वर्षे असते. खोडे पोकळ झालेले काही वृक्षसुद्धा आढळले आहेत. अशा खोडात मादागास्करमध्ये आलेल्या वादळाच्या वेळी काही लोकांनी आश्रय घेतला होता.
…म्हणून महाराष्ट्रात गोरखचिंच नाव
महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात धमोरी येथे पुरातन वृक्ष असून परिसरातील लोक येथे पूजा करतात. गोरक्षनाथ यांचे शिष्य अडबनगीनाथ यांनी याच ठिकाणी तप केले, अशी आख्यायिका आहे. नावामागील आख्यायिका गोरखचिंचेखाली बसून गोरक्षनाथांनी शिष्यांना विद्यादान केले म्हणून याला गोरखचिंच हे नाव पडल्याचे सांगितले जाते. याच्या बाओबाब या आफ्रिकन नावाचा अर्थ ज्येष्ठवर्य असा आहे.
महिला रुग्णालयामध्ये आफ्रिकन बाओबाब हे आकर्षक वृक्ष आढळून आले आहे. त्याचे जतन करून खासगी कंपनीच्या सीआरएस फंडातून हेरिटेज ट्री म्हणून पर्यटन सेल्फी पॉइंट विकसित करण्यात येणार आहे. झाडाचे महत्त्व काय, किती वर्षांपूर्वीचे आहे ही माहिती तेथे लावली जाणार आहे. पंधरा दिवसात त्याचे काम सुरू होईल.
– डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी रत्नागिरी