‘जिद्दी’ कडून कुडू, पायली सुळके सर

रत्नागिरी:- रत्नागिरीच्या जिद्दीच्या ग्रुपला नेहमी नवनवीन सुळके जणू साधच घालत असतात. आंबोलीनजीक (जि. सिंधुदुर्ग) चौकुळ गावाजवळ कुडू आणि पायली या नावाचे दोन सुळके असून यावर कोणी चढाई केली नसल्याची माहिती मिळाल्यावर कोणत्याही स्थितीत या सुळक्यांवर चढाई करण्याचा चंग बांधला आणि जिद्दी टीमने रेकी करून यशस्वी चढाई केली.

जिद्दीचे लिड स्लायंबर अरविंद नवेले व जिद्दीचे सदस्य उमेश गोठिवरेकर यांना या सुळक्यांसंबंधी माहिती मिळाली होती. चौकुळ गावाजवळ या कुडू व पायली या नावाच्या सुळक्यांवर चढाई करताना जिद्दीच्या मेंबरच्या चिकाटी आणि मेहनतीचा कस लागला. कुडू व पायली ही नावे फार पूर्वी धान्य मोजण्यासाठी वापरात येणाऱ्या साधनांची होती. या सुळक्यांच्या कडेला भातशेती होती. पूर्वीच्या काळात लोक कातळ भिंतींना २० ते २५ फुटाची बांबुची शिडी लावून खाली उतरून या सुळक्यांच्या कडेने पुढील बाजूला शेतीसाठी जात. तांदूळ, नाचणी घेऊन ते याच मार्गाने घरी जात. या शेतीवरूनच पूर्वी कधीतरी या दोन सुळक्यांना कुडू व पायली ही नावं दिली गेली असावीत, असे सांगितले जाते.

या सुळक्याच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी ४० फुटांची घसरण व २५ फुटांची सरळ भिंत रॅपलिंग करत खाली उतरावे लागते. याच मार्गाने परत येताना क्लायबिंग करत यावे लागते. या सुळक्यांवर चढाई करताना ड्रिल मशिनने होल मारून बोल्डिंग करत चढायचे ठरले. परंतु यामध्ये अडचणी निर्माण झाल्याने पिटॉन मारत या सुळ्यांवर जिद्दीचे लिड क्लायंबर अरविंद नवेले यांनी प्रथम यशस्वी चढाई केली. त्यांच्या सोबत सेकंड लिड क्लायंबर प्रसाद शिगवण यांनी या सर्वांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली. मोहिमेत उमेश गोठिवरेकर, सतीश पटवर्धन, आशिष शेवडे, अमरेश ठाकुरदेसाई, ओंकार सागवेकर, चिपळूणचे आकाश नाईक सहभागी झाले होते.

९ ते ५३ वर्षांच्या क्लायंबर सहभागी
मोहिमेत २० ते ३८ वयोगटातील तरुण सहभागी झाले. यात ९ वर्षाच्या सृजन पटवर्धन याने त्यांच्या बाबांसोबत स्वत: या सुळक्यावर चढाई केली व वयाच्या ५३ व्या वर्षी उमेश गोठिवरेकर यांनी चढाई केली हे विशेष. कुडू सुळक्याच्या दगडांची परिस्थिती पाहता ते ठिसूळ असल्याने त्यावर फक्त अरविंद नवेले यांने एकट्याने चढाई केली. पायली सुळक्यावर सर्वांनी चढाई केली.

अत्याधुनिक साधने, सुरक्षितता प्रथम
चढाईत सर्व सुरक्षीत व अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात आला. कोणत्याही मोहिमेत एक बॅकअप इमर्जन्सी प्लॅन तयार ठेवायला लागतो. त्या टिमला सपोर्ट करावा लागतो. यासाठी जिद्दी माउंटेनेरिंगच्या इतर लोकांनी रत्नागिरीतून सपोर्ट केला. एखाद्या सुळक्यावर चढाई करण्यापूर्वी तेथील भौगोलिक स्थिती, साधनसामग्रीची माहिती, अचानक उद्भवणाऱ्या संकटांची तयारी, सुळक्यांच्या दगडांची शास्त्रशुध्द माहिती त्या ठिकाणी जाण्याच्या वाटा, चढाई साठी जाणा-या टिमच्या सुरक्षिततेची पूर्ण खात्री आणि तयारी, पाण्याची व्यवस्था यांची खात्री करून आराखडा आखला.