जालगाव बाजारपेठेत वीज पडून लाखोंचे नुकसान

दापोली:- तालुक्यातील जालगाव बाजारपेठ येथे सोमवारी दुपारी वीज पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले. दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास अचानक गडगडाटासह वीज कोसळली आणि काही क्षणांतच बाजारपेठेतील अनेक घरांतील इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक उपकरणे जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ६ ग्रामस्थांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

जालगावचे तलाठी बोरसे, पोलीस पाटील धीरज कदम व कोतवाल अनिकेत पाते यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यात सुजय मेहता, अरविंद तलाठी व महेंद्र शेठ यांचे इन्व्हर्टर जळून गेले तर चंद्रशेखर बुटाला यांचा टीव्ही व इन्व्हर्टर, सूर्यकांत आपटे यांचे ४ पंखे, संदीप तलाठी यांचे सीसीटीव्ही कॅमेरे तसेच स्थानिक काजू फॅक्टरीतील ड्रायर व केतन आपटे यांच्या घरातील इन्व्हर्टर व पॅनल लाईट पूर्णपणे निकामी झाले.

दरम्यान, काही क्षणातच गडगडाट झाला आणि एका झटक्यात वीज बाजारपेठेतून गेली. नंतर ती जवळील निर्जन ठिकाणी कोसळल्याचे सांगण्यात आले. या आकस्मिक नैसर्गिक आपत्तीमुळे जालगावमध्ये दिवाळीच्या उत्साहावर विरजण पडले. नुकसानग्रस्त नागरिकांनी प्रशासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली असून स्थानिक महसूल विभागाने तातडीने पंचनामा पूर्ण केला आहे.