रत्नागिरी:- महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच जात पडताळीण प्रमाणपत्रे मिळाली तर भविष्यात नोकरी किंवा उच्च शिक्षणावेळी गैरसोय होणार नाही. यासाठी समाज कल्याण आयुक्तांनी महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र काढण्यास तयार केले. या विशेष मोहीमेची सुरवात संविधान दिनी नोव्हेंबर महिन्यात आंबडवे (ता. मंडणगड) येथून केली. गेल्या ६० दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात १ हजार १५० जणांना जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात आले. जात प्रमाणपत्र पडताळणीची हा मंडणगड पॅटर्न म्हणून राज्यभर ओळखला जात आहे.
शिक्षण घेत असताना जात प्रमाणपत्र पडताळणी झाल्यास भविष्यात फारशा अडचणी येत नाहीत. या भूमिकेतून समाजकल्याण आयुक्त तसेच बार्टीच्या महासंचालकांनी नियोजन केले. मंडणगड (जि. रत्नागिरी) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शालेय शिक्षण झालेल्या आंबडवे गावातून उपक्रमाची सुरवात झाली. अनेकदा शासकीय सेवेत प्रवेश झाल्यानंतर केवळ जात प्रमाणपत्र वैधता पडताळणी झाली नाही म्हणून पदोन्नती व तत्सम लाभ योग्य वेळी मिळत नाहीत. मात्र पुढच्या पिढीला अशी अडचण येणार नाही याची खात्री मंडणगड पॅटर्न देत आहे.
जिल्हा जात पडताळणी समितीने ऑक्टोबर २०२२ पासून उपक्रमाची कार्यवाही सुरु केली. ११ वी व १२ वी मधील विद्यार्थी व पालक यांना ऑनलाईन अर्ज करत महाविद्यालयात संपर्क अधिकारी नेमून अर्ज गोळा केले. त्यासाठी प्राचार्य, संपर्क अधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार व सेतू सुविधा चालक यांच्या बैठका घेतल्या. प्रत्येक तालुक्यात प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. विशेषतः बारावी शास्त्र शाखेतील व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र लागते. विद्यार्थ्यांचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची छाननी, आवश्यक तेथे कागदपत्र मागवून घेणे, चौकशी करणे यासाठी वेळ लागतो. महाविद्यालयाकडून एक गठ्ठा अर्ज आले की ही प्रकिया वेगाने होते. १८ ऑक्टोबर २०२२ ला मंडणगड तालुक्यातील ५० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरीत केली. २५ नोव्हेंबरला दापोलीत, २६ नोव्हेंबरला मंडणगड येथे जिल्हाधिकार्यांच्या हस्ते कार्यक्रम झाले. पुढे प्रत्येक तालुक्यातून झालेल्या कार्यक्रमात आतापर्यंत १ हजार १५० प्रमाणपत्रे दिली गेली. २७ जानेवारीला रत्नागिरी शहर व तालुक्यात प्रमाणपत्र वाटप होईल.