ओबीसी संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय
रत्नागिरी:- रत्नागिरी शहर ओबीसी विभाग अध्यक्षपदी सुशांत (मुन्ना) चवंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने जातीनिहाय जनगणना केली नाही तर आक्रमक होऊन जनआंदोलनाची तयारी संघर्ष समितीने जिल्हाभरात सुरु केली आहे.
रत्नागिरी तालुका ओबीसी संघर्ष समितीतर्फे गेले दोन महिने प्रत्येक जिल्हापरिषद गटात ओबीसींना एकत्रित आणण्यासाठी बैठका घेतल्या. ग्रामीण भागाबरोबरच शहरामध्येही ओबीसी सेल कार्यान्वित करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्याची सुरुवात मंगळवारी (ता. 19) झाली. ओबिसी जातीनिहाय जनगणना व ओबीसी समाजाच्या समस्या बाबत जनजागृतीसाठी सर्वांना एकत्रित आणण्यासाठी रत्नागिरी शहरातील केतन मंगल कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले होते. संघर्ष समितीचे रघुवीर शेलार यांनी प्रास्ताविक करून ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आता संपूर्ण तालुक्यात सभा होत आहेत, रत्नागिरी शहरात आपली ताकद वाढली तर भविष्यात त्याचा फायदा रत्नागिरी तालुक्याला पुढे जाऊन जिह्याला होऊ शकतो असे त्यांनी सांगितले. संघर्ष समितीचे विचारवंत व ओबीसी गाढे अभ्यासक बि.टी.झोरे यांनी ओबीसी म्हणजेच इतर मागासप्रवर्ग हे अजूनही काही जण मान्य करण्यास तयार नाहीत. तर मागासवर्गीय म्हणून इतरांकडे बोट दाखवणे आपण सोडून द्यायला हवे. आता आपल्याला ओबीसी म्हणून एकत्रित लढावे लागले यासाठी आपण ताकदीनिशी एकत्र या असे आवाहन केले. ब्रिटिश काळापासून आजपर्यंतची व्यवस्था, ओबीसी समाजासाठी संविधानातील तरतूदी, ओबीसी समाजाच्या भल्यासाठी नेमलेले आयोग व शासन व्यवस्था याबाबत दिपक राऊत यांनी सांगितले.
ओबीसी जनआंदोलनात आमचा पाठींबा आहे व आज ओबीसी बांधवांना विचार सभेमध्ये पोहचवण्याचे काम समोर बसलेली मंडळी पोहचवत आहे, त्याबाबत सोशल मीडियावर जनजागृती व्हावी असे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी सभेत सुचवले. ओबीसी समाजाची आता निर्णायक वेळ आली आहे, जातनिहाय जनगणना झाली नाही तर उग्र आंदोलन रत्नागिरी तालुक्यातून सुरू होईल आणि रत्नागिरी शहरातून आजची प्रमुख मंडळींची उपस्थिती ही आपली ताकद असेल असे ओबीसी राज्य कार्यकारिणी सदस्य कुमार शेट्ये यांनी आपले मत व्यक्त केले.
या सभेत संघर्ष समितीच्या पदाधिकार्यांच्या नियुक्तया झाल्या. त्यात ओबीसी शहर विभाग अध्यक्षपदी सुशांत (मुन्ना) चवंडे, उपाध्यक्ष दिलावर गोदड, सलील डाफळे, सचिव मंदार नैकर, सहसचिव मंदार शिंदे, खजिनदार सुरेंद्र घुडे आणि शहर युवा अध्यक्ष म्हणून राहूल रसाळ यांची निवड करण्यात आली. या सभेला तालुका उपाध्यक्ष राजीव कीर, दिपक राऊत, कुमार शेट्ये यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.