जाकादेवी येथे भरधाव दुचाकीच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील जाकादेवी बाजारपेठेत रस्ता ओलांडणार्‍या प्रौढाला भरधाव दुचाकीची धडक बसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला अपघाताची ही घटना बुधवार 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वा.सुमारास घडली.
शिवाजी गोविंद कुळ्ये (50, रा.तरवळ कुळ्येवाडी, रत्नागिरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.

याबाबत त्यांचा मुलगा सुमित कुळ्ये याने ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, बुधवारी त्याचे वडिल शिवाजी कुळ्ये हे जाकादेवी बाजारपेठेत रिक्षा स्टँडवर जाण्यासाठी रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी श्रीराज प्रसाद सावंत (23,रा.मांजरे देसाईवाडी,संगमेश्वर) हा आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एल-2779) घेउन भरधाव वेगाने त्याच रस्त्याने जात असताना त्याच्या भरधाव दुचाकीची धडक शिवाजी कुळ्ये यांना बसल्यामुळे ते रस्त्यावर खाली पडले. त्यात त्यांच्या डोक्याला गंभिर दुखापत झाल्याने तेथील नागरिकांनी त्यांना प्रथम जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेउन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी शिवाजी कुळ्ये यांना तपासून मृत घोषित केले. या अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलिस करत आहेत.