५४ हजाराचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी:- जाकादेवी बाजारपेठेत विनापरवाना खतांचा साठा करून विक्री करणाऱ्या दुकानदारावर ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ५४ हजार १६० रुपयांचा खताचा साठा जप्त करण्यात आला असून, दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी मिलिंद सावंत यांच्याकडे खत विक्री व साठा करण्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी किंवा परवाना नसताना, त्यांनी त्यांच्या ‘श्रीसाई कृपा अँग्रो कृषी निविष्ठा विक्री केंद्र’ या दुकानात कृषी अमृत, मिराकल, सम्राट, शक्ती आणि कुमस गोल्ड या ब्रँड्सच्या खतांचा अवैध साठा केला होता. २९ जुलै रोजी सकाळी १० वाजता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी दुकानातील एकूण ५४,१६० रुपये मूल्याचा खताचा साठा जप्त केला असून, याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
याप्रकरणी राजेंद्र नारायण कंभार (रा. खेडशी, ता. व जि. रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. मिलिंद केशव सावंत (रा. खालगाव जाकादेवी, ता. व जि. रत्नागिरी) यांच्यावर अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ आणि रासायनिक खत नियंत्रण आदेश १९८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.









