मंडणगड:- प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असतानाच मंडणगड तालुक्यातील जांभुळनगर येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा जयश्री जितेंद्र बर्जे यांचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, ज्या दिवशी सकाळी त्यांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण पार पडले, त्याच दिवशी सायंकाळी काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
जांभुळनगर येथील रहिवासी असलेल्या ३२ वर्षीय जयश्री बर्जे या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. २६ जानेवारी रोजी सकाळी त्यांनी शाळेत ध्वजारोहण करून राष्ट्रीय सण साजरा केला. त्यानंतर त्या आपल्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसऱ्याच्या शेतात शेतमजूर म्हणून कामाला गेल्या होत्या. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास काम करत असताना त्यांच्या पायाला एका विषारी सापाने दंश केला. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने घराकडे धाव घेत कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली. त्यांना उपचारासाठी तातडीने दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.
बर्जे कुटुंबावर एकाच महिन्यात झालेला हा दुसरा मोठा आघात आहे. काही दिवसांपूर्वीच जयश्री यांच्या सासऱ्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. या दुःखातून सावरत असतानाच कुटुंबातील कर्त्या महिलेचा असा अकाली मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या या कुटुंबात त्यांचे पती खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतात. जयश्री बर्जे यांच्या पश्चात पती, सासू, १० वर्षांची मुलगी आणि ६ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे जांभुळनगर परिसरात सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे.









