जल जीवन मिशनमधून दरडोई किमान 55 लिटर पाणी प्रतीदिन पुरवठा करण्याचे नियोजन: विक्रांत जाधव

रत्नागिरी:- जल जीवन मिशनमधून प्रत्येक कुटुंबाना नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लिटर पाणी प्रतीदिन पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी आराखडे तयार करण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिली.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जल जीवन मिशनचा समावेश आहे. त्याचा आढावा अध्यक्ष जाधव यांनी घेतला. ग्रामीण भागातील सर्व कुटूंबांना 2024 पर्यंत घराघरात पाणी पुरवठा करण्याचे उद्दीष्ट केंद्र सरकारने निश्‍चित केले आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा सहभाग आहे. प्रत्येक घरात वैयक्तिक जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लिटर प्रतीदिन, गुणवत्तापूर्वक पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. स्वयंपाकासाठी आणि घरगुती वापरासाठी शुद्ध व पुरेसे पाणी दिले जाणार आहे. पाणी योजना लोकांच्या सोयीच्या ठिकाणी राबविण्यात येणार आहेत. सद्यःस्थितीत सुरू असलेल्या योजनांची दुरुस्तीही यामधून करण्यात येणार आहे. त्यांच्या पुनर्वसन प्रकल्पांना पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. भुजल साठा शोधून तिथे स्वतंत्र पुरवठा घेण्यात येणार आहेत.

जल जीवन मिशनमधून गावातील शेवटच्या घरापर्यंत घरगुती जोडणी दिली जाणार आहे. यामध्ये 50 टक्के हिस्सा केंद्र शासनाचा तर 50 टक्के हिस्सा राज्य शासनाचा आहे. याची अंमलबजावणी ही ग्रामपंचायत किंवा ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती राहणार आहे. कुटूंबांना घरगुती नळ जोडणी देण्याची जबाबदारी समितीची राहील. गावकृती आराखडा तयार करणे, योजनांचे नियोजन, रचना, अंमलबजावणी व देखभाल दुरुस्ती करणे ही जबाबदारी समितीकडे सोपवण्यात आली आहे.
जल जीवन मिशन कार्यक्रमात पाच टक्के लोकवर्गणी अनुसूचित जाती, जमाती या घटकांसाठी आहे. इतर घटकांसाठी 20 टक्के लोकवर्गणी सामुदायिक योगदान, रोख रक्कम किंवा श्रमदानाद्वारे देता येईल. त्यासाठी ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष व सचिव यांचे संयुक्तरित्या बँक खाते उघडण्यात येणार आहे. लोकवर्गणी व देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपट्टी वसुलीबाबत स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात येणार आहे.