प्रस्ताव तयार करण्यास वेग; अध्यक्ष विक्रांत यांचे प्रयत्न
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेतील शाखा अभियंत्याच्या रिक्त पदांमुळे जल जीवन मिशन योजनतील कामांचे प्रस्ताव तयार करण्यापासूनची कामे रखडली आहे. त्यासाठी अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या प्रयत्नामुळे सार्वजनिक पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जल जीवन मिशनच्या कार्यक्रमासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्स्लटंन्सी, पीएमसी) नियुक्त करण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेतील अनेक पदे रिक्त असून ती भरण्यासंदर्भात कार्यवाही झालेली नाही. त्यामध्ये बांधकाम आणि पाणी पुरवठा विभागातील अभियंत्याचाही समावेश आहे. पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी प्रभारींची वर्णी लागली आहे. अनेक शाखा अभियंता नसल्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या जल जीवन मिशनचे आराखडेच तयार झालेले नाहीत. कामांचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करुन त्याला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेण्यासाठीची कामेही रखडली आहेत. या आराखड्यातील कामे पुढील पाच वर्षात पूर्ण करावयाची आहे. जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीमध्ये यावर दरवेळी खडाजंगी होती. अधिकार्यांना कामे करण्याचे आदेश दिले जातात; मात्र परिस्थिती जैस थेच राहते. अध्यक्ष विक्रांत यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन यावर पर्याय काढण्याची मागणी केली होती. रिक्त पदे भरा अशी मागणीही केली होती. जल जीवन मिशनचे कामे करण्यासाठी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पीएमसी नेमण्यात आली आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश असून काही दिवसांपुर्वी एजन्सीचे पथक रत्नागिरीत दाखल झाले आहे. त्यामुळे रखडलेल्या जलजीवन मिशनच्या कामांना वेग येणार आहे. ही एजन्सी कामांचा प्रस्ताव तयार करणे, अंदाजपत्रक बनविणे, तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठविणे ही कामे करणार आहेत. तांत्रिक मान्यतेत ज्या त्रुटी राहतील, त्यांची पुर्तताही ही एजन्सीच करणार आहे. त्यामुळे कामे पूर्ण करणे शक्य होणार असून हर घर मे जल से नल हा उद्देश सफल होणार आहे.