व्यावसायीक नाराज ; पर्यटकांचाही झाला हिरमोड
रत्नागिरी:- जल व साहसी क्रीडा पर्यटन 26 मे पासून बंद ठेवण्याच्या सूचना पर्यटन विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील विविध किनार्यांवरील सुमारे दहा लाखाची उलाढाल थांबली आहे. पर्यटन हंगाम संपण्याच्या अखेरच्या टप्प्यात हे आदेश प्राप्त झाल्यामुळे व्यावसायीकांमध्ये तिव्र नाराजी व्यक्त केली जात असून पर्यटकांचाही हिरमोड झाला आहे.
मागील काही वर्षात दापोली तालुक्यातील हर्णे, कर्दे, गुहागर आणि पालशेत तर रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे, मालगुंड, नेवरे-काजीरभाटी, आरे-वारे याठिकाणी किनारी भागात साहसी क्रीडा प्रकारांसह नौकानयन सुरु करण्यात आले आहे. यामुळे किनार्यावरील पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे. यावर्षी उशिराने सुरु झालेला पर्यटन हंगामात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून पर्यटकांची संख्या जिल्ह्यात वाढू लागली होती. विशेषत: जलपर्यटनाला वाढता प्रतिसाद मिळत आहे. एकट्या गणपतीपुळे किनारी 17 नौका आणि 12 जेट स्की आहेत. अन्य किनार्यांवरही या प्रमाणात व्यावसाय करणारे आहेत. पर्यटन हंगामामध्ये जिल्ह्यातून सुमारे दररोज वीस लाखाची उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे. वॉटर स्पोर्टस चालवणार्या संस्थांना 31 मे पर्यंत परवानगी देण्यात आली होती. मान्सून जूनमध्ये सक्रीय होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. गेले दोन दिवस किनारी भागात वारे वाहू लागले आहेत. हवामानातील या बदलांमुळे पावसाची शक्यता आहे. उत्साही पर्यटकांना धोका निर्माण होऊ नये यासाठी पर्यटन संचालनालयाचे सहाय्यक संचालक रविंद्र पवार यांनी सर्व वॉटर स्पोर्टस संस्था चालकांना शुक्रवारी 26 मे ते 31 ऑगस्टपर्यंत जालपर्यंटन बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश मिळाल्यानंतर शनिवारी (ता. 27) जलपर्यटन बंद ठेवण्यात आले आहे. चौथा शनिवार व रविवार असल्याने पर्यटक मोठ्याप्रमाणात जिल्ह्याच्या किनारपट्टीवर दाखल झाले आहेत. शेवटच्या टप्प्यात गणपतीपुळेमध्ये दिवसाला दहा ते बारा हजार पर्यटक येऊन जात आहे. उन्हाचा कडाका असला तरीही पर्यटकांची संख्या कमी झालेली नाही. ऐन हंगामात जलक्रीडा बंद ठेवण्यामुळे पर्यटकांमध्ये तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. किनार्यावर फक्त फिरण्यापेक्षा नौकानयन, जेट स्कीमधून समुद्रात सैर करण्याचा आनंद वेगळाच असतो. त्याचा लाभ घेण्यासाठी पर्यटक एक दिवस मुक्काम करतात. जलक्रीडा बंद झाल्यामुळे पयर्र्टक थांबणे शक्य नाही. त्याचा परिणाम निवासाच्या आरक्षणार होऊ शकतो असे जलक्रीडा आयोजकांकडून सांगितले जात आहे. 1 जून पासून मच्छिमारी बंदी कालावधी सुरु होते. ते खोल समुद्रात जाऊन मासेमारी करतात. मात्र किनार्यावर विशिष्ट अंतरापर्यंत जेटस्की, नौकानयन करणार्यांना बंदी घालणे किती योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.