जलजीवन मिशनचे होणार ‘थर्ड पार्टी ऑडिट’

१ हजार ३५३ योजनांपैकी ९७ पूर्ण; ११० गावे ‘हर घर जल’ घोषित

रत्नागिरी:- जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेतून ‘हर घर हर जल’युक्त गावे बनवण्यासाठी १ हजार ४९६ गावांमध्ये १ हजार ३५३ योजनाचा आराखडा तयार असून, वर्कऑर्डर देण्यात आली आहे. आतापर्यंत ९७ योजना पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे ११० गावे हर घर नलसे जल म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या कामांसाठी ९०० कोटींचा निधी आहे. या कामांचा दर्जा पाहण्यासाठी थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित होते.

जिल्ह्यातील विविध योजनांच्या कामांबाबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी माहिती दिली. विविध विभागामार्फत सुरू असलेल्या विकासकामांची प्रगती त्यांना सांगितली. २०२२-२३ जिल्हा वार्षिक योजनेतून २७१ कोटींचा निधी प्राप्त झाला. हा सर्व निधी ३१ मार्चअखेर खर्च झाला आहे. २०२३-२४ साठी जिल्हा वार्षिक योजनेतून ३०० कोटींच्या आराखड्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातील १० टक्के निधी म्हणजे २३ कोटी जिल्ह्यासाठी प्राप्त झाले आहेत. १ हजार ९९० कामांना यातून मंजुरी दिली आहे. आता किती कामांच्या निविदा, वर्कऑर्डर दिली याचा आढावा घेण्यासाठी बुधवारी बैठक लावण्यात आली आहे.

सिंधुरत्नसाठी आराखडा तयार

रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी असलेल्या सिंधुरत्न योजनेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचा आराखडा तयार केला असून, त्याचे प्रेझेंटेशन समितीचे अध्यक्ष दीपक केसरकर यांना दिले. पुढील तीन वर्षांचे काय नियोजन आहे ते दाखवण्यात आले. योजनेअंतर्गत १३५ कोटीला मंजुरी देण्यात आली आहे. ३०० कोटीचा हा आराखडा असून दरवर्षी १०० कोटीची कामे घेतली जाणार आहेत. त्यामुळे वैयक्तिक लाभासह अन्य कामांचा यामध्ये समावेश आहे. जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहन सिंह यांनी केले.

जिल्ह्यातील ११ नद्यांचा गाळ काढणार

जिल्ह्यात २०२१ला आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ११ नद्यांमधील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा नियोजनमधून वेगळा, जलसंपदा विभागाचा वेगळा आणि काही सामाजिक संस्थांचा मिळून सुमारे ११ कोटी ३० लाखाचा निधी मिळाला. त्यापैकी ८ कोटी चिपळूणला देण्यात आले आहेत. टप्पा 2 मधील गाळ ५ जूनपूर्वी काढण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी स्पष्ट
केले.

पाच वर्षांत उच्चांगी शासकीय वसुली

जिल्ह्यातील शासकीय वसुलीमध्ये महसूल विभागाने चांगले काम केले आहे. मार्च २०२३ अखेर झालेल्या वसुलीमध्ये गेल्या पाच वर्षांपेक्षा यंदा चांगली वसुली झाली आहे. १२० कोटीचे जिल्हा प्रशासनाला टार्गेट होते. त्यापैकी १११ कोटी रुपये वसूल झाले आहेत. सुमारे ९२ टक्के ही वसुली झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी दिली.