जलव्यवस्थापन समिती; अंदापत्रके तयार करण्यात चालढकल
रत्नागिरी:– जलजीवन मिशन योजनेतील कामांची अंदाजपत्रके पूर्ण करण्यात पाणी पुरवठा विभागाकडून चालढकल करण्यात आली होती. यावरुन जिल्हा परिषद पदाधिकार्यांसह सदस्यांनी जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत तिव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत अधिकार्यांनाही कडक शब्दात तंबी दिली आहे.
जलव्यवस्थापन समितीची सभा सोमवारी (ता. 1) विक्रांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी उपाध्यक्ष उदय बने, सभापती परशुराम कदम, चंद्रकांत मणचेकर यांच्यासह अन्य सभापती, सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते. यामध्ये जलजीवन मिशन योजनेचा आढावा घेण्यात आला. ही योजना गांभिर्याने मार्गी लावण्यासाठी मागील सर्व सभांमध्ये चर्चा झाली होती. यामधून पाणी पुरवठा विभागामार्फत हर घर नल से जल देण्यासाठी गावागावात नळजोडण्या देण्यात येणार आहे. जलजीवन मिशनअंतर्गत पुढील पाच वर्षांचा कोट्यावधीचा आराखडा बनविला आहे. परंतु त्याचे काम समाधानकारक नसल्याचे आढळून आले. याबाबत अधिकार्यांकडूनही उत्तरे मिळालेली नाहीत. यावरुन पदाधिकार्यांसह सर्वांनीच तिव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले.
शाखा अभियंत्यांची पदे रिक्त असून अनेक प्रभागांचे पदभार त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे कामाचा अधिक भार होऊ नये यासाठी प्रत्येक अधिकार्यांने प्रभागातील एका कामाचे अंदाजपत्रक तयार करुन ते जिल्हा परिषदेला सादर करावे अशी सुचना पदाधिकार्यांनी केली होती. अनेकांकडून त्याचीही पुर्तता झालेली नाही. यावरुन सर्वचजणं संतापलेले होते. ही कामे येत्या काही दिवसात पूर्ण करा अशी तंबीही अधिकार्यांना देण्यात आली आहे. या कामांचा आढावा घेण्यासाठी 10 ते 12 नोव्हेंबर दरम्यान अध्यक्ष विक्रांत आढावा घेणार आहेत.









