जलजीवनच्या कामांसाठी मार्च २०२४ पर्यंत मुदत

रत्नागिरी:- जलजीवन मिशन हा केंद्र शासनाचा महत्वांकाक्षी कार्यक्रम आहे. मार्च २०२४ च्या आधी सर्वांनी आपापल्या योजनेची कामे पूर्ण करावीत तसेच वैयक्तीक नळजोडणीबाबतचे प्रमाण वाढवावे. ज्या योजना अद्यापही जमिनीच्या उपलब्धतेबाबत अपूर्ण आहेत त्या योजनांसाठी तत्काळ जमीन उपलब्ध करून द्यावी तसेच एमएसईडीसीबाबत कार्यवाही होत नसल्यास तालुकास्तरावर गटविकास अधिकारी व ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता यांच्या मदतीने मार्ग काढावा. योजना पूर्ण करून आपले गाव हर घर जल घोषित करावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षामार्फत राबवण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. ही कार्यशाळा एम. डी. नाईक हॉल येथे झाली. सीईओ कीर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना पाणी या घटकाबाबत सजग करण्यासाठी जिल्हास्तरावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कार्यशाळेला पंचायत स्तरावरील सर्व गटविकास अधिकारी, उपअभियंता, विस्तार अधिकारी तसेच जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील सरपंच व ग्रामसेवक हे उपस्थित होते.

कार्यशाळेला युनिसेफ मुंबईद्वारे मंदार साठे यांनी जलजीवन मिशन कार्यक्रम देखभाल दुरुस्ती व हस्तांतरण प्रक्रिया, जयंत देशपांडे यांनी पाणी व स्वच्छताक्षेत्रात लोकसहभागाचे महत्व, संदीप तेंडुलकर यांनी पाणी व स्वच्छताक्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग तर बालाजी व्हरकट यांनी हवामान बदल व पाणीपुरवठा योजनांवर होणारा परिणाम या विषयी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रकल्प संचालक राहुल देसाई यांनी केले. समारोप कार्यकारी अभियंता मयुरी पाटील यांनी केले.