निकष पाळून व्यवसाय करण्याची मुभा; जिल्हा प्रशासनाचे आदेश
रत्नागिरी:- पर्यटन व्यावसाय तेजीत असतानाच किनारी भागातील जलक्रीडा व्यावसायावर उपजिविका करणार्यांना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिलासा दिला आहे. मेरीटाईम बोर्डाच्या परवानगीने कोरोनाचे निकष पाळून जलक्रीडा व्यावसाय सुरु करण्यास जिल्हाप्रशासनाने परवानगी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, संग्रहालये, समुद्रकिनार्यांवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. मंडणगड, दापोली, गुहागर, रत्नागिरी, राजापूर तालुक्यातील समुद्रकिनारी पर्यटकांचा राबता असतो. तेथे मनोरंजनाकरीता स्थानिकांमार्फत विविध जलक्रिडा प्रकार सुरु केले आहेत. त्यात बोटींग, एटीव्हीरायडींगसह विविध खेळांचा समावेश आहे. त्याद्वारे स्थानिकांना रोजगार तसेच उपजिविकेची साधने उपलब्ध होत असते. कोविडच्या प्रादुर्भावामुळे शासनाने लागू केलेल्या निर्बंधामुळे जलक्रिडाप्रकार बंद केले होते. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर विविध बाबींना निर्बंधातून वगळले. सर्व प्रकारच्या खाजगी व सार्वजनिक वाहतुकीस मान्यता दिल्याने पर्यटक जिल्ह्यातील समुद्रकिनार्यांवर येत आहेत.
मुरुड बीच वॉटर स्पोर्टस् अॅण्डवेलफेअर असोसिएशन (ता. दापोली, जि. रत्नागिरी) यांनी हर्णे हद्दीतील किनार्यावरील वॉटर स्पोर्ट व्यवसाय सुरु करण्यास परवानगी मिळण्याबाबत विनंती केली आहे. त्यानुसार हे जलक्रिडाप्रकार चालविणार्या व्यवसायिकांनी निर्बंध शिथिल करण्याबाबत विनंती केली आहे. वस्तुस्थिती विचारात घेऊन ज्या व्यवसायिकांना महाराष्ट्र मेरेटाईम बोर्डाने अधिकृतरित्या परवाना दिलेला आहे, त्यांना कोविड संदर्भातील मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन व्यावसाय सुरु करण्यास जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी मान्यता दिली आहे. पर्यटन व सांस्कृतिक विभागामार्फत निर्गमित केल्या जाणार्या मानक कार्यप्रणालीचा अवलंब करणे बंधनकारक राहील. तसेच आवश्यक ते शारिरीक अंतर बाळगणे, मास्क घालणे व वेळोवेळी सॅनिटाईझिंग करणे बंधनकारक राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्यांविरोधात फौजदारी दाखल केली जाईल.









