जयस्तंभ संखेश्वर गार्डन मधील नागरिकांची रनपत धडक 

रत्नागिरी:- शहरातील जयस्तंभ संखेश्वर गार्डनमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी मंगळवारी रनपवर धडक दिली. या सोसायटीला नवीन योजनेतून कनेक्शन जोडण्यात आले आहे. मात्र नवीन कनेक्शन जोडण्यात आल्यापासून या सीसायटीचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. वारंवार तक्रार करून दुर्लक्ष केले जात आहे. सोसायटीला विकतचे टँकर घ्यावे लागत असल्याने अखेर येथील नागरिकांनी मंगळवारी रनपवर धडक दिली. 
 

शहरात नव्या पाणी योजनेचे काम पूर्णत्वास जात आहे. बहुसंख्य ठिकाणी जोडण्या पूर्ण करण्यात आल्या असून पाणी कनेक्शन कार्यान्वित करण्यात आले आहे. जयस्तंभ येथील संखेश्वर गार्डनला देखील पंधरा दिवसांपूर्वी नवे कनेक्शन जोडण्यात आले आहे. मात्र नवे कनेक्शन जोडल्यापासून सोसायटीला होत असलेला पाणी पुरवठाच बंद झाल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे.
 

मंगळवारी या सोसायटीतील बहुसंख्य महिला आणि सदस्यांनी पाणी विभागाचे अधिकारी यांना जाब विचारला. यावेळी नगरसेवक सोहेल मुकादम देखील उपस्थित होते. नवे कनेक्शन जोडण्यात आल्याने जुने कनेक्शन बंद करण्यात आले आहे. मात्र नवे कनेक्शन जोडण्यात आल्यापासून पाणी पुरवठा बंद झाल्याची तक्रार वारंवार करण्यात आली. नगर परिषद प्रशासन रोज वेगवेगळी उत्तरे देत आहे. विकतचे पाणी घेण्याचा भुर्दंड सोसायटीला सहन करावा लागत असून यावर कायमस्वरूपी उपाययोजना आखा अशी आक्रमक मागणी नागरिकांनी केल्यानंतर बुधवारी यावर उपाययोजना करण्यात येईल असे पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.