जयगड सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांची तातडीने बदली

राकेश जंगम खून प्रकरण; एसपी नितीन बगाटे यांनी घेतली दखल

रत्नागिरी:- जयगड परिसरात घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने जिल्हाभर खळबळ माजली असतानाच, राकेश जंगम बेपत्ता आणि खून प्रकरणातील हलगर्जीपणाचा आरोप सिद्ध होताच जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई केली. जयगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) कुलदीप पाटील यांची तात्काळ बदली पोलिस नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसुंबकर यांनी राकेश जंगम बेपत्ता प्रकरणात पाटील यांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला होता. त्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन “दोषींवर कारवाई केली जाईल” असा शब्द दिला होता. या वक्तव्याला अनुसरूनच बदलीची कारवाई पार पडली. या संपूर्ण तपासाची जबाबदारी अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्याकडे होती.

तपासातून उघडकीस आले की, 6 जून 2024 रोजी राकेश जंगम याचा खून झाल्यानंतर त्याचा मृतदेह आंबाघाट येथे टाकण्यात आला होता. या प्रकरणात मुख्य आरोपी दुर्वास पाटील याने चौकशीत कबुली दिली. त्याच्यासोबत विश्वास पवार व नीलेश भिंगार्डे यांचीही नावे समोर आली. राकेश जंगम हा दुर्वास पाटीलच्या खंडाळा येथील बारमध्ये वेटर म्हणून काम करत होता. 21 जून 2024 रोजी राकेशच्या आईने जयगड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.

संपूर्ण वर्षभर शोधमोहीम राबवूनही जयगड पोलिसांना राकेशचा माग सापडला नव्हता. त्याचदरम्यान मिरजोळे येथील भक्ती मयेकर खून प्रकरणाची चौकशी सुरू झाली आणि त्यातूनच राकेशच्या खुनाचा धागा मिळाला. या विलंबामुळे जयगड पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पाटील यांची बदली करण्याचा निर्णय घेतला.
राकेश जंगम खून प्रकरणात जयगड पोलिसांच्या हलगर्जीपणावर आता पुन्हा एकदा कडक चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.