जयगडमधील ट्रक मालकांचे बाळ मानेनी थकवले दीड कोटी

लॉरी असोसिएशनकडून आरोप; रक्कम परत देण्याची मागणी

रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड परिसरातील लॉरी असोसिएशनच्या ट्रक मालकांनी रत्नागिरीतील ‘यश ट्रान्सपोर्ट‘चे मालक बाळ माने यांच्याविरोधात पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत. गेल्या 2013 साला पासून थकीत असलेली सुमारे दीड कोटी रुपयांची रक्कम न दिल्यामुळे शेकडो ट्रक मालक कर्जबाजारी झाले. त्यामुळे अनेकांचे ट्रक बँकांनी ओढून नेल्याचा गंभीर आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. माने यांनी ट्रक मालकांचे थकीत असलेले दीड कोटी रुपये त्वरित द्यावेत, अशी मागणी लॉरी असोसिएशनने व्यक्त केली आहे.
यासंदर्भात रत्नागिरीत बुधवारी जयगड येथील लॉरी असोसिएशने पत्रकार परिषद घेत माने यांयावर जोरदार टीका आणि आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. बाळ माने यांची पैसे देण्याची दानत नाही, असा स्पष्ट आरोप केला. चांगला ट्रान्सपोर्ट व्यवसाय चालू असताना केवळ माने यांच्या चुकीमुळे तो बुडाला. त्यामुळे राजकारणात विकासकामांवर बोलण्यापूर्वी त्यांनी लोकांचे पैसे द्यावेत, असे खडेबोल सुनावण्यात आले.

या पत्रकार परिषदेला लॉरी असोसिएशन जयगड चे प्रतिनिधी आणि ट्रक मालक योगेंद्र कल्याणकर, साळवी, आदेश पाखरे, विकी सामंत, अलिकदर साळगरे, प्रसाद घाग, अमिस पिरेकर, शराफत गडुबे, आजिम चिकटे, शरद चव्हाण, आदेश पावसकर, दीपक पाटील, राजेश पाटील, उदय चिके, विनय चव्हाण, अनिल कदम, राजेंद्र केळूसकर, मुदस्सर ठाकूर, संदीप महाडीक यांच्यासह मोठय़ा संख्येने ट्रक मालक उपस्थित होते.

असोसिएशनच्या माहितीनुसार, 2013 मध्ये माने यीं ‘यश ट्रान्सपोर्ट‘ कंपनी कार्यरत असताना बाळ माने यांनी ट्रक मालकांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे चेक दिले होते. मात्र, हे सर्व चेक बाऊन्स झाले. वारंवार मागणी करूनही ‘आज उद्या देतो‘ अशी आश्वासने मिळाली, पण पैसे त्यांयाकडून मिळाले नाहीत, असेही सांगण्यात आले. बाळ माने यांनी पैसे न दिल्याने अनेक ट्रक मालक कर्जबाजारी झाले, त्यांची कर्जे बुडाली आणि शेवटी बँकांनी त्यांचे 400 पैकी 300 पेक्षा जास्त ट्रक ओढून नेले, असा गंभीर आरोप ट्रक मालकांनी केला.

2018 साली बाबू पाटील यांच्या मध्यस्थीने व 2023 मधील खासदार नारायण राणे यांया निवडणूकी वेळी पालकमंत्री सामंत यांच्या मध्यस्थीने ट्रक मालकांनी पैशांची मागणी केली होती. निवडणूक काळात बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्यावर माने यांनी काही रक्कम दिली, मात्र थकीत दीड कोटी रुपये अद्यापही दिलेले नाहीत, असे सांगण्यात आले.
पैशांसाठी बाळ माने यांच्या घरीही हेलपाटे मारावे लागले होते. त्या त्रासाने सर्व तरूण लॉरी मालक पूर्णपणे हताश झाले. लॉरी असोसिएशनची मागणी आहे की, बाळ माने यांनी ट्रक मालकांचे थकीत असलेले दीड कोटी रुपये त्वरित द्यावेत. उपस्थितांनी संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या. या माणसावर विश्वास ठेवू नये आणि त्यांना आमच्याबद्दल आपुलकी राहिलेली नाही, असे स्पष्टपणे पत्रकार परिषदेत सांगितले.