कार्यकर्ता संवाद यात्रा; गटबाजीची गंभीर दखल, पक्षासाठी काम करण्याची ताकीद
रत्नागिरी:- जिल्ह्यात एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मोठा पक्ष होता. त्यानंतर हळुहळु आमच्या हातातून काही विधानसभा मतदारसंघ निसटत गेले. गटातटाचे राजकारण दिसून आले. त्यामुळे आजच्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रत्येकाची मते जाणून घेतली. यामध्ये प्रचंड गटतट असल्याचे दिसून आले. याची गंभीर दखल मी घेतली आहे. आता यापुढे गटतट विसरून पक्ष बळकटीसाठी कामाला लागा, अशी ताकीद पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
गेली दोन दिवस कार्यकर्ता संवाद यात्रेनिमित्त प्रदेशाध्यक्ष रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत. गुरुवारी दापोली कार्यक्रम झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी येथील नगरवाचनालयामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात पक्षा व्यतिरिक्त पत्रकारांसह अन्य कोणालाही प्रवेश दिला नाही. मात्र दुपारी पत्रकार परिषदेत घेऊन याबाबतची माहिती दिली.
प्रदेशाध्यक्षांनी पक्षाबद्धल प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्यास सांगितले. तशी नावानिशी नोंद प्रदेशाध्यक्षांनी घेतली. काहींनी सांगितले वरिष्ठांकडुन निवडणुकामध्ये पाठबळ मिळत नाही, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना विचारात घेतले जात नाही. पक्षाचे निर्णय कळविले जात नाहीत. गटा-तटांचे राजकारण सुरू असल्याने पक्षवाढीला खिळ बसली आहे. त्यावर वरिष्ठांनी निर्णय घेण्याची गरज आहे. या गटबाजीमुळे कार्यकर्ता दुखावला जात आहे, अशा अनेक तक्रारी पदाधिकाऱ्यांबद्धल करण्यात आला. त्यानंतर जयतं पाटील यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. यापूर्वी देखील अशा तक्रारी गेल्या होत्या. मात्र त्यामध्ये अपेक्षित सुधारणा झालेली नाही. त्यामुळे अनेकांना चांगलेच सुनावल्याचे समजते. याबाबत जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्ह्यात मोठे स्थान होते. मात्र विधानसभा मतदारसंघ निसटत गेल्याने पक्षाची ताकद कमी होत गेली. गटतट वाढु नयेत यासाठी आमही प्रयत्न केले. मात्र त्या कुरघोड्या सुरूच होत्या. आजच्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर या कुरघोड्यांबाबत गंभीर दखल घेतली. पक्षाच्या मुळावर त्या येणार असतील तर त्या संपविण्याचे ताकीद दिली आहे. यापुढे पक्ष बळकटीसाठी कामाला लागा, अशा सूचना केल्या आहेत.